मुंबई: गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने अनेक महत्त्वाची कामं केली आहेत, देशाचा विकास झाला असून जगभरात भारताचा डंका वाजत आहे, त्यामुळेच आम्ही यावेळी 400 पेक्षा जास्त जागा जिंकणार असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah Exclusive Interview) यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीचा देशात तिसरा टप्पा सुरू झाला असून अमित शाह यांनी एबीपी न्यूजसाठी खास मुलाखत दिली. त्यामध्ये अमित शहा यांनी आरक्षणावर व्हायरल झालेल्या बनावट व्हिडीओपासून ते इलेक्टोरल बाँडपर्यंतच्या अनेक मुद्द्यांवर उघडपणे मत व्यक्त केले.


भाजप 400 पार जाणार 


गेल्या दहा वर्षांमध्ये मोदी सरकारने देशाचा विकास केला असून त्याचा फायदा यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये होणार असल्याचा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. अमित शाह म्हणाले की, 2014 साली सत्तेत आल्यानंतर आम्ही विकासकामं केली आणि त्या आधारे 2019 साली निवडणुकीत मतं मागितलं. त्या निवडणुकीत 300 हून जास्त जागा आम्ही जिंकल्या. या टर्ममध्ये नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वाची कामं केली, लाखो गरिबांना दारिद्ररेषेवर काढलं. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात देश पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. भाजप आणि एनडीएचे समर्थक भरभरून मतदान करत आहेत. पंतप्रधान मोदींनी एका वर्षात 10 लाख नोकऱ्या दिल्या आहेत. बंगालमध्ये भाजप किमान 30 जागा जिंकेणार आहे. महाराष्ट्रात गेल्या वेळच्या तुलनेत एक-दोन जागा वाढू शकतील किंवा कमी होऊ शकतात, पण महाराष्ट्रात फार मोठा बदल होणार नाही. त्यामुळे त्याच्या आधारे आम्ही आता मतं मागत असून यावेळी 400 पेक्षा जास्त जागा जिंकणार. 


महाराष्ट्रात एखाद्या दुसऱ्या जागेचा फरक पडेल


महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सहानुभूती असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे भाजपला त्या ठिकाणी अडचणी येणार असल्याचं बोललं जातंय. त्यावर बोलताना अमित शाह म्हणाले की, मी ग्राऊंड लेव्हलचा अभ्यास केला असून गेल्या वेळच्या तुलनेत एखादी-दुसरी जागा कमी किंवा जास्त होईल. गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा वेगळं चित्र असणार नाही.


आमची संघटना आता तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमध्ये बऱ्यापैकी वाढली आहे. आम्ही आमचे संकल्प पत्र देशासमोर ठेवले आहे, आम्ही दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू असंही अमित शाह म्हणाले. 


ही बातमी वाचा: