अमरावती : तुम्ही कृषीमंत्री (Agriculture Minister) असताना आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांची माफी मागा, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी दिल्याने शरद पवारांनी माफी मागितली. यावर अमित शाह यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं आहे. तुम्ही 10 वर्ष कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं. विदर्भात शेतकऱ्यांनी तुमच्या कार्यकाळात आत्महत्या केल्या आहेत, त्यांच्या कुटुंबियांची माफी मागा, असं म्हणत अमित शाह यांनी शरद पवारांला सवाल विचारला आहे. अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते.


अमित शाहांचा इंडिया आघाडीवर निशाणा


अमरावतीच्या अंबादेवी, एकवीरा देवीला नमन करत अमित शाहांनी भाषणाला सुरुवात केली. नवनीत राणांना दिलेलं प्रत्येक मत मोदींना. देशाला दहशतवाद, नक्षलवाद मुक्तीकडे नेणारे हे मत असेल. काँग्रेसने 70 वर्ष राम मंदिर लटकवून ठेवलं. उद्धव ठाकरेंना राममंदिर प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण दिलं, पवारांना, राहुल गांधींना निमंत्रण दिलं ते आले नाहीत. नकली शिवसेना अध्यक्ष प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेले नाहीत. मोदींनी फक्त राम मंदिरचं नाही तर काशी-विश्वनाथ कॉरिडॉर तयार केला, असं म्हणत अमित शाहांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे. 


काँग्रेस वोट बँकेचं राजकारण करते


अमित शाह म्हणाले, महाराष्ट्राने संकल्प करायचा आहे की, प्रत्येक जागेवरून कमळ फुलवायचं आहे. काश्मीर आपलं आहे की नाही आहे. खरगे म्हणतात राजस्थान आणि महाराष्ट्राचे काश्मिरशी काय देणे-घेणे. मोदींनी 370 हटवून काश्मिरला कायमचा देशाचा हिस्सा बनवलं. कलम 370 या अनौरस बाळाला सांभाळण्याचे काम काँग्रेसने केले. काँग्रेस वोट बँकेचं राजकारण करते. आपल्याशी नडणाऱ्या पाकिस्तानमध्ये जात मोदींनी एयर स्ट्राईक केले. 


संविधान बदलावायचे हा अपप्रचार 


आम्हाला 400 जागा मिळवून संविधान बदलावायचं हा अपप्रचार काँग्रेस करतेय. आम्हाला असं करायचं असतं तर आम्हाला 2014 पासून पूर्ण बहूमत आहे, तेव्हाच केलं असतं. मात्र, आम्ही याचा उपयोग करत 370 हटवणं, ट्रिपल तलाकला बंदी असे निर्णय घेतले, असंही शाहांनी म्हटलं आहे.


उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे संस्कार सोडले


अमरावतीमध्ये हत्या झाल्या, तेव्हा सो कॉल्ड हिंदू हित रक्षक उद्धव ठाकरे यांनी काहीही केलं नाही. उद्धव ठाकरे तुम्ही बाळासाहेबांचे सर्व संस्कार सोडले. आमचे एकनाथ शिंदे बाळासाहेबांच संस्कार घेऊन पुढे जात आहेत आणि आमचं सरकार बनलं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे, आता कोणत्याही उमेश कोल्हेची हत्या होणार नाही. नवनीत राणा यांच्या नावासोरील कमळाचं बटण दाबा, इतकं जोरात दाबा की बटण अमरावतीमध्ये दाबाल आणि करंट इटलीमध्ये बसेल, असं अमित शाह म्हणाले.