मुंबई : वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून (Maha Vikas Aghadi Seat Sharing ) एकमत होतांना पाहायला मिळत नसून, अशात आता प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) थेट काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांना पत्र लिहले आहे. राज्यातील सात मतदारसंघांमध्ये काँग्रेसला (Congress) पूर्णपणे पाठिंबा वंचित बहुजन आघाडी देईल, असे आंबेडकरांनी खरगे यांना पत्रातून प्रस्ताव दिला आहे. तर, दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीच्या कोणत्याही बैठकीसाठी किंवा चर्चेसाठी निमंत्रित न करता डावलण्यात येत असल्याचे देखील आंबेडकर म्हणाले आहेत. त्यामुळे आमचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)  या दोनही पक्षावरील विश्वास उडाला असल्याचे आंबेडकर या पत्रात म्हणाले. 


काय म्हटले आहे पत्रात?


प्रकाश आंबेडकर यांनी मलिकार्जुन खरगे यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, “17 मार्च रोजी मुंबईतील भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या सभेत तुम्हाला आणि राहुल गांधी यांना भेटून आनंद झाला. आम्ही सविस्तर संभाषण करू शकलो नाही, त्यामुळे आज मी तुम्हाला पत्र लिहित आहे. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून, महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी निमंत्रित न करता सातत्याने बैठका घेतल्या जात आहे. 


महाराष्ट्रातील 7 जागांवर काँग्रेसला वंचितचा पाठींबा... 


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी अनेक बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला. महाविकास आघाडीत वंचितला समान न्याय न देण्याच्या वृत्तीमुळे आमचा या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडाला आहे. वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा भाजप, आरएसएस, फुटीरतावादी आणि लोकशाही संपवणाऱ्या विरोधात आहे. या विचाराने आम्ही महाराष्ट्रातील 7 जागांवर काँग्रेसला वंचितचा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 


भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा प्रस्ताव?


तुम्हाला विनंती आहे की मला महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या कोट्यातील 7 मतदारसंघांची नावं द्यावीत, आमचा पक्ष तुमच्या पसंतीच्या या 7 जागांवर तुमच्या पक्षाच्या उमेदवारांना पूर्ण पाठींबा देईल. वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छ नाही तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा विस्तारही असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Prakash Pohare And Prakash Ambedkar Meeting | भाजपा उमेदवाराचा मामा प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला, अर्धा तास बंद दाराआड चर्चा; भाच्याला धक्का देणार?