मुंबई: कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितल्याच्या कारणावरून छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना मारहाण करणारे आणि त्यानंतर युवक प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी झालेल्या सूरज चव्हाण यांचे अवघ्या महिन्याभरात राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती झाली असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, आदिती तटकरे, नवाब मलिक, समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यानंतर आता विरोधक आक्रमक झाले आहेत, विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेसह पक्षातील नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. याबाबत आता मंत्री माणिकराव कोकाटेंनी याबाबत बोलणं टाळलं आहे.
सुरज चव्हाण यांना पक्षात देण्यात आलेल्या सरचिटणीस पदाबाबत नियुक्तीचे सर्वस्वी अधिकार पक्षाध्यक्ष अजित पवार यांना आहेत. याबाबत मला बोलण्याचे कुठलेही अधिकार नाही आणि मी बोलणे हे उचित नाही, असं म्हणत क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बोलणं टाळलं. त्यानंतर गोगावले आणि तटकरे वादावर देखील त्यांनी बोलणं टाळलं आहे. मी फक्त नंदुरबार जिल्हा पुरतच बोलणार अशी माणिकराव कोकाटे यांनी भूमिका घेती आहे.
नेमकं काय प्रकरण?
पावसाळी अधिवेशन सुरू असताना तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधीमंडळाच्या सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावरती व्हायरल झाला होता. या प्रकरणावरून राज्यभरात संतापाची लाट उसळली आणि विविध ठिकाणी आंदोलनं झाली. लातूर येथे कार्यकर्ता संवाद कार्यक्रमादरम्यान छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागणीसाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या समोर पत्ते फेकत निषेध नोंदवला. यावेळी चिडलेल्या सूरज चव्हाण यांनी विजय घाडगे यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेनंतर सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई करत त्यांची युवक प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, अवघ्या महिन्याच्या आतच त्यांना पुन्हा पक्षातील महत्त्वाचे पद देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
रोहित पवार काय म्हणालेत?
लातूरमध्ये केलेल्या गुंडगिरीप्रकरणी पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेण्याचा अजितदादांचा निर्णय योग्यच होता, परंतु महिनाभराच्या आतच त्या वादग्रस्त पदाधिकाऱ्याचे प्रमोशन केले जात असेल तर याला काय म्हणायचं?,अजितदादांच्या पक्षात दोन गट असून दुसरा भाजपप्रेमी गट जाणूनबुजून अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्यरत असतो. ‘शब्दाला पक्का’ या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी कालची वादग्रस्त नियुक्ती केली गेली अशी चर्चा आहे. मारहाण करताना फ्रॅक्चर झालेल्या हातावरील प्लास्टरचा पट्टा निघण्याच्या आतच प्रमोशन केलं, नियुक्ती करणाऱ्याच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. शेवटी, ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’!, अशा शब्दात रोहित पवारांनी हल्लाबोल केला आहे.