पुणे : लोकसभा निवडणुकीतील पराभव राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार (Ajit pawar) यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यात, बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभव पत्कारावा लागल्याने अजित पवारांवर नामुष्कीची वेळ आली. अगोदर मुलाचा पराभव, त्यानंतर पत्नीचा पराभव झाल्याने अजित पवारांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) केवळ एका जागेवर विजय मिळवता आला. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनिल तटकरे निवडून आल्याने थोडीशी इज्जत राखली, अशा शब्दात अजित पवारांनी जाहीर भाषणात लोकसभेतील पराभवाची खंत बोलून दाखवली होती. त्यानंतर, आता बारामती (Baramati) दौऱ्यावर असलेल्या दादांकडून बारामतीकरांनाही याचा जाब विचारला जात आहे.
पवारांचं होम ग्राऊंड असलेल्या बारामतीतल्या वृंदावन गार्डन येथे कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी, लोकसभा निवडणुकीतील पराभवाची खंत बोलून दाखवतानास, चक्क माझ्याकडे सगळ्यांनी राजीनामे द्यावेत, असं विधान अजित पवार यांनी केलं. मागे काय झालं त्या बद्दल माझी काही तक्रार नाही, कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो. मी 9 तारखेपासून राज्याचा दौरा करतोय, मी राज्याचा दौरा करत असताना माझं घर मला सांभाळावे लागेल. लोकसभेला अनेक बूथवर आपण कमी पडलो. जे झालं त्याला मी जबाबदार आहे, मला संघटनेत बदल करायचे आहेत. त्यामुळे, माझ्याकडे सगळ्यांनी राजीनामे द्यावेत, अशा शब्दात अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांना दम भरला. शहर, ग्रामीण, महिला, सगळ्या सेलच्या लोकांनी सगळ्यांनी मला राजीनामे द्यावेत, मी पुढं बघू काय करायचे ते. लोकं म्हणतात त्यात तेल ओतण्याचे काम केलं, आपल्या स्टेजवर बसायचं आणि मागे वेगळं बोलायचं. माझं काटेवाडी प्लस मध्ये गेलं म्हणून मला बोलण्याचा अधिकार आहे, असेही अजित पवारांनी कार्यकर्ता मेळाव्यात सुनावले.
ज्या बुथवर आपण आहोत त्याने आकडेवारी बघून मान्य केलं पाहिजे. मला शेती करायची आवड आहे मी सकाळी 6 वाजता विहिरीचे काम सुरू आहे, ते बघायला गेलो होतो. शेतकऱ्यांचे बिल भरायचं तर 15 हजार कोटींचा भार येणार होता तो आम्ही उचलला. 5 वर्षांच्या वीज बिल माफीचा जीआर देखील काढला आहे. मी अर्थसंकल्प सादर करताना असा संकल्प जाहीर करेल असे विरोधकांना वाटलं नाही. मला यायला वेळ लागला पण त्याचा तुम्ही असा विचार करू नका की निकाल असा लागला म्हणून दादा नाराज आहे. निवडणुकांमध्ये असा निकाल लागला ठीक आहे, माझं वय 65 झालं आहे, मी जेष्ठांमध्ये मोडतो, तरीही मी काम करतोय, असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटले.
लोकसभेला मतदान केलं नसेल त्यांनाही फॉर्म भरु द्या
लाडकी बहीण चुनवी जुमला म्हणून सांगितले, अशा योजना वेगवेगळ्या राज्यात राबिवल्या जातात. संजय गांधी निराधार योजनेचे पैसे कालांतराने वाढवले. सरकारला गरीब जनतेला मदत करायची आहे. पण त्यात लोकांना काही फसवणूक करू नका, कोणतीही योजना आणल्यावर काही त्रुटी राहतात. जिने आपल्याला लोकसभेला मतदान दिले नसले तरी तिला फॉर्म द्या, इथे पक्ष आणू नका, असे म्हणत लाडकी बहीण योजनेवर अजित पवारांनी भाष्य केलं. आचार संहिता लागेपर्यंत जे कुणी फॉर्म येईल त्यांना जुलै,ऑगस्ट,सप्टेंबरचे पैसे मिळतील. काहीजण फॉर्म भरणाऱ्यांना तुसड्यासारख वागत होते. अरे घरात आई-बहीण आहे का नाही? असं वागायचं असेल तर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी येऊ नका. जर तुमचा मूड नसेल तर मूड नीट होईपर्यंत पब्लिक मध्ये येऊ नका. जर कुणी अस वागले तर मी पक्षातून हकालपट्टी करेल, असा दमही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.