Akola: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (18 जून) अकोल्यात सभा घेतली. या सभेतील भाषणादरम्यान फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंचं दुकान आम्ही बंद केल्याचं फडणवीस म्हणाले.


'उद्धव ठाकरेंचं दुकान बंद करुन बाळासाहेबांच्या शिवसेनेला पुनर्जिवन '


ज्या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची वेळ येईल, त्या दिवशी मी शिवसेनेचं दुकान बंद करेल, पण त्यांच्यासोबत मी जाणार नाही असं बाळासाहेब ठाकरेंनी म्हटल्याचं मला आठवतं, असं फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरे मात्र खुर्चीसाठी त्यांच्यासोबत गेले, म्हणून आम्ही त्यांचं दुकान बंद केलं आणि बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष एकनाथ शिंदेंच्या रुपात पुन्हा जिवंत केला, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.


'ठाकरेंच्या भाषणाचं स्क्रिप्ट लिहिणारेही शिंदेंसोबत गेले'


उद्धव ठाकरेंचं भाषण लिहीणारे स्क्रिप्ट रायटर सुद्धा शिंदे गटात गेले आहेत आणि त्यामुळे आता त्यांच्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून स्क्रिप्ट रायटर उधारीवर आणण्याची वेळ आली आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.


'ठाकरेंचीही अवस्था न सांगण्यासारखी'


देवेंद्र फडणवीसांना सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंना कशी कशी आणि कुठे कुठे आग होते हे तुम्हाला सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, पण आम्हाला समजतंय, असं फडणवीस म्हणाले. 2019 ला भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरे खुर्चीच्या मोहामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले, तेव्हा मी पुन्हा येईल बोललो होतो आणि पुन्हा आलो. सोबत एकनाथ शिंदेंना देखील घेऊन आलो, असं फडणवीस म्हणाले.


'लोक सोडून चालले, तरीही हे भाषण करत बसले'


उद्धव ठाकरे अजूनही भाषणंच ठोकत आहेत, रोज लोक यांचा पक्ष सोडून चालले तरी अजून त्यांना जाग आली नसल्याचं फडणवीसांनी म्हटलं. अवघे 40 आमदार नाकाखालून निघून जातात, तरी यांनी समजत नाही, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.


'घरात बसून राजकारण करणाऱ्यांना मोदी-शाह काय माहिती'


उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर सातत्याने टीका करतात, त्यावरुन देखील फडणवीसांनी उद्धव ठाकरेंनी सुनावलं. मोदींवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना उद्देशून 'कोण होतास तू? काय झालास तू? अरे वेड्या कसा वाया गेलास तू? असं फडणवीस म्हणाले. नरेंद्र मोदींसोबत तुम्ही मुकाबला करू शकत नाही. मोदींनी अयोध्येला श्रीराम मंदिर बांधलं, काश्मीरला भारताशी जोडून 370 कलम हटवणारे मोदीच होते. काश्मीरला कधी तुटू देणार नाही, असं मोदी म्हणतात. पण घरी बसून काम करणाऱ्यांना आणि घरी बसून राजकारण करणाऱ्यांना मोदी-शाह काय माहिती, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.


'कोणीच मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही'


एखादा व्यक्ती जेव्हा प्रसिद्ध होऊ लागतो, तेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात ह्यांचं मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र. पण, कुणाचा बापही जमिनीवर आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकणार नाही, असं फडणवीसांनी ठणकावून सांगितलं.


हेही वाचा:


Sanjay Raut : मोदी-शाहांशी आमचं वैयक्तिक भांडण नाही, आमचं भंडण महाराष्ट्रद्रोह्याशी; संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल