मुंबई : पक्ष संघटनेत मंत्र्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Group) मंत्र्यांचे प्रगतीपुस्तक (Progress Report) काढण्यात येणार आहे. अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत नेमून दिलेल्या जिल्ह्यात मंत्री जात नसल्यामुळे नाराजीचा सूर आहे. मंत्र्यांवर जबाबदारी देऊन महिना उलटला तरी नेमून दिलेल्या जिल्ह्यात मंत्री जात नसल्यामुळे संबंधित मंत्र्यांकडून कामकाजाचा अहवाल मागवण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला आहे. मंत्र्यांना खात्याचा भार सांभाळतानाच जबाबदारी दिलेल्या जिल्ह्यात जाऊन कार्यकर्ता मेळावे घेणे, पक्षाच्या शिबिरांना हजेरी लावणे, पदाधिकऱ्यांच्या बैठका घेणे अशा जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत.
कोणत्या मंत्र्यांवर कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी?
अजित पवार - पुणे, सातारा, सांगली, सोलापूर
छगन भुजबळ - नाशिक, मुंबई शहर, मुंबई उपनगर
दिलीप वळसे पाटील - अकोला, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा
हसन मुश्रीफ - कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अहमदनगर
धनंजय मुंडे - बीड, परभणी, नांदेड, जालना
संजय बनसोडे - हिंगोली, लातूर, उस्मानाबाद
अदिती तटकरे - रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर
अनिल पाटील - जळगाव, धुळे, नंदुरबार
धर्मारावबाबा आत्राम - गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ
खासदार प्रफुल पटेल - भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, नागपूर
अजित पवारांसह नऊ जण राज्याच्या मंत्रिमंडळात
महाराष्ट्राच्या राजकारणात 2 जुलै हा दिवस राजकीय भूकंपाचा ठरला. राज्यात मोठी घडामोड घडली होती. अजित पवार यांनी शरद पवार यांना मोठा धक्का देत शिवसेना भाजप युती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले तर त्यांच्यासोबत आठ मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, अदिती तटकरे, अनिल पाटील,
धर्मारावबाबा आत्राम हे राज्याच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले.
महिना उलटला तरी मंत्री जात नसल्याने नाराजी
यानंतर अजित पवार गटाकडून संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात आला. त्यानुसार अजित पवार गटाने आपल्या नऊ मंत्र्यांवर राज्यभरातील विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली होती. यामध्ये नवे कार्यकर्ते पक्षात घेणे, विद्यमान नेते आणि पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन करणे अशा जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. परंतु मंत्र्यांवर जबाबदारी देऊन महिना उलटला तरी नेमून दिलेल्या जिल्ह्यात मंत्री जात नसल्यामुळे संबंधित मंत्र्यांकडून कामकाजाचा अहवाल मागवण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला आहे.
हेही वाचा
Sharad Pawar : Vasant Dada Sugar Institute मध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक, अजित पवार गैरहजर