बीड : राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा (Election) प्रचार अंतिम टप्प्यात आला असून बडे नेतेही प्रचाराच्या मैदानात आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचार दौरे करत असून बीड नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ बीड (Beed) शहरातील बशीरगंज भागात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांची जाहीर सभा संपन्न झाली. येथील सभेला राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते नवाब मलिक यांची उपस्थिती होती. मात्र, या सभेला आमदार धनंजय मुंडेंची (Dhananjay munde) अनुपस्थिती असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. येथील सभेतून अजित पवारांनी विकासावर भाष्य करताना बीडमधील गुन्हेगारी, भ्रष्टाचार, शहराची दुर्दर्शा यावर भाष्य केलं. तसेच, इथे 150 कोटींची गफळा झालाय, याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करेल, असा इशाही अजित पवारांनी बीडमधून दिला.
बाकीच्या जिल्ह्यामध्ये विकासाला निधी दिल्यानंतर विकास होतो. पण, आपल्या इथं काहीच होत नाही, क्रिडांगण नाही, जॉगिंग ट्रॅक नाही. मागच्या काळातला निधी चांगल्या पद्धतीने खर्च झाला नाही, त्याबाबतची माहिती घेण्याचं काम सुरू आहे, त्याची चौकशी लावलेली आहे. इथं दीडशे कोटी रुपयांचा गफळा झालाय असं समोर आलंय, याप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करतोय. मात्र, ही खूप मोठी साखळी आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.
इथलं जे नेतृत्व होतं ते कमी पडलं, बीडमधल्या विविध पतसंस्थांमध्ये 6 ते 7 कोटी अडकले आहेत. अनेकांनी आत्महत्या केल्या, ज्यांच्यामुळे आत्महत्या केल्या, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. इथे कुणी दुर्लक्ष केलं कोण कमी पडलं? जे इथलं नेतृत्व करतात त्यांना कळत नाही. एका परिवाराच्या हातात हे दिलं आहे. तुम्ही माझ्या हातात 5 वर्ष द्या, असे आवाहन अजित पवारांनी येथील जनतेला केला. दरम्यान, बीडमध्ये सभा सुरू असताना अजान सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले भाषण थांबवले होते. तुमचं माझं जे काही बरं वाईट होईल ते या बीडमधून होणार आहे. नसेल निवडून द्यायचं तर राहा मागं, काय माझ्या बापाचं, काकाच जातंय, असेही अजित पवारांनी म्हटले
मला एकदा संधी देऊन बघा, मी बारामती बदलुन दाखवली आहे. इथं रस्त्यात खड्डाय की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही, याला जबाबदार कोण? असे म्हणत अजित पवारांनी दोन्ही क्षीरसागरांवर निशाणा साधला. भाजी मंडई बांधता आणि तिथे भाजी विकायला लोक बसत नाहीत, रस्त्यावर बसतात. ही तुमची कर्तबगारी, त्याच्यासाठी तुम्ही नेतृत्व केलं? असा सवालही अजित पवारांनी विचारला.
खासदार-आमदारांवर निशाणा
बाकीचे जिल्हे सुधारले आणि आपण मागे राहणार का? पुढची पिढी काय म्हणेल. कुणाची बटणं दाबताय. शहराची दुर्दशा, तुम्हाला मतदान मागायचा काय अधिकार आहे का, कुठल्या तोंडाने मतं मागताय. ज्याला तुम्ही निवडून देता त्याच्या अंगातच पाणी नाही. तुमचं माझं जे काही बरं वाईट होईल ते या बीडमधून होणार आहे. नसेल निवडून द्यायचं तर राहा मागं, काय माझ्या बापाचं, काकाच जातंय, असेही अजित पवारांनी म्हटले. येथील आमदार-खासदारांचं काम आहे. त्यांनी काय केलं? झोपा काढल्या की आपली घर भरली असे म्हणत आमदार संदीप क्षीरसागर आणि खासदार बजरंग सोनवणेंवरही निशाणा साधला.
हेही वाचा
राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंनी घेतली श्रीकांत शिंदेंची भेट; शिवसेनेच्या ऑफरबाबतही स्पष्टच सांगितलं