पुणे: नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शाळांमध्ये पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पडसाद उमटत आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीच्या (Hindi Language) या धोरणाला कडाडून विरोध केला आहे. आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत, असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठणकावून सांगितले होते. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. सध्या समोरच्या समोरच्या राजकीय पक्षांना मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळे ते उगाच वाद घालत आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले. ते शुक्रवारी पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सध्या कुणाला उद्योग नाही. मराठी आपली मातृभाषा आहेच. त्याबद्दल कोणाचं दुमत नाही. प्रत्येक राज्याला आपली मातृभाषा असते त्याविषयी आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा असतो. तो टिकला पाहिजे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान मोदी साहेबांनी दिला. खूप वर्षे दिल्लीत हे प्रकरण पडून होतं, ते कोणी करण्याचं धाडस दाखवलं नाही. ते एनडीए सरकारने, मोदी साहेबांनी दाखवला. त्याचे कार्यक्रमही आम्ही घेतले. आता मराठी भाषा भवन मरीन ड्राईव्हला चांगल्याप्रकारची वास्तू तयार करण्याचे ठरवले आहे. सगळा आराखडा तयार आहे, निधीची कुठलीही कमतरता नाही. हे करत असताना जगात मॅक्झिमम भाषा इंग्रजी ही चालते. त्यामुळे तुमच्या आमच्या घरात नवीन पिढीला महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलंच पाहिजे. त्याचबरोबर भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये हिंदी पण चालतं. काही जण म्हणतात हिंदी राष्ट्रभाषा आहे, पण त्यावर वाद आहे, मला त्या वादात शिरायचं नाहीय. बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना, काम नाही ना, ते असले वाद काही ना काही घालतात. त्याच्यात ते वेळ घालवतात. इंग्रजी ही जगात सर्वत्र चालते, त्यामुळे तीदेखील आली पाहिजे. तिन्ही भाषेला महत्त्व आहे. पण शेवटी स्वत:ची मातृभाषा तिला नंबरच एकचं स्थान आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.

राज ठाकरे यांनी काय म्हटले?

राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र 'हिंदीकरण' करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. 

आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका.  या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे  प्रकार का सुरु झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले. 

आणखी वाचा

हिंदी भाषा का शिकली पाहिजे, मराठी शाळांमध्ये सक्ती का? देवेंद्र फडणवीसांनी शैक्षणिक धोरणाचं कारण उलगडून सांगितलं

आता महाराष्ट्रात पहिलीपासून इंग्रजीबरोबर हिंदीही सक्तीची, नव्या शैक्षणिक धोरणामुळे वादंग निर्माण होणार?