Aaditya Thackeray: राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे आणि ठाकरे गटात सतत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. दरम्यान अशात गेल्या काही दिवसांपासून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा उल्लेख छोटा पप्पू म्हणून केला जात आहे. तर सत्तार यांच्या याच टीकेला आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादमधील आक्रोश मोर्च्यातून उत्तर दिले आहे. मला छोटा पप्पू म्हंटल्याने जर राज्यातील प्रश्न सुटत असतील तर नक्कीच मला छोटा पप्पू म्हणा असे आदित्य ठाकरे म्हणाले आहे. 


यावेळी बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, माझा उल्लेख अब्दुल सत्तार छोटा पप्पू म्हणून उल्लेख करत आहे. त्यामुळे मला नक्कीच छोटा पप्पू म्हणा,माझा उल्लेख छोटा पप्पू म्हणून करा, पण यातून राज्यातील प्रश्न सुटणार आहे का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तर माझं नाव छोटा पप्पू ठेऊन राज्यातील शेतकरी खुश होणार असतील, माझं नाव छोटा पप्पू ठेवल्याने राज्यात उद्योग येणार असतील तर चला आजपासून छोटा पप्पू ठेवा मी स्वीकारले, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांना लगावला आहे. 


सत्तार यांची हकालपट्टी करा...


पुढे बोलतांना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर पुन्हा एकदा खोक्यावरून निशाणा साधला. कोण गद्दार आमदार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो पण कारवाई होत नाही. दुसरा एक गद्दार महिलांना शिवीगाळ करतो, पण कारवाई होत नाही. अशा लोकांना पद पदमुक्त करून मंत्रीमंडळातून हकालपट्टी झाली पाहिजे असेही आदित्य ठाकरे म्हणाले. पण कुठेही कारवाई होत नाही. एका गद्दाराच्या राक्षसी महत्वकांक्षामुळे संपूर्ण महाराष्ट्र मागे चालला असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नव्हे तर मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहे की, ते अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करतील असेही आदित्य ठाकरे म्हणाले. 


देता की जाता...


पुढे बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री यांच्याकडून काहीही आता अपेक्षा राहली नाही. त्यामुळे आता यापुढे राज्यात कुठेही कृषिमंत्री आणि उद्योग मंत्री दिसल्यास त्यांना 'देता की जाता' असे तरुणांनी विचारले पाहिजे. आमचा रोजगार देता की जाता हे त्यांना विचारा असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले. 


Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे औरंगाबादच्या पैठण दौऱ्यावर, आक्रोश मेळाव्यात होणार सहभागी