बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं भाषण सुरू असताना आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचा फोन आला. बच्चू कडू यांचा फोन आला,  असं सांगत एक जण अजित पवारांजवळ आला, त्यावर अजित पवार म्हणाले, थांबा जरा भाषण करतो आहे. तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरु असून प्रचारासाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक राहिल्याने सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही सभांचा धडाका लावला आहे. बारामती (Baramati Lok Sabha Election 2024) उंडवडी येथे अजित पवारांची शनिवारी सभा पार पडली. यावेळी हे दृष्य पाहायला मिळालं आहे.


अजित पवारांचं भाषण सुरू असताना बच्चू कडूंचा फोन


अजित पवारांचे भाषण सुरू असताना मधेच एक जण बच्चू कडू यांचा फोन आला, असे सांगत आला, त्यावर अजित पवार म्हणाले, थांबा जरा, भाषण करतो आहे. यानंतर अजित पवारांनी पुन्हा भाषण सुरु ठेवलं. अजित पवार पुढे म्हणाले, मी इतर बाबतीत काम केलं पण, मला पाण्याचा प्रश्न मी सोडवत होतो. मोदींना मी सांगितले आहे की, पाण्यासाठी मला निधी पाहिजे. भावनिक होऊ नका, अजून 10 वर्ष तुमचं काम करू शकतो.


जनतेची कामे व्हावी यासाठी सरकारमध्ये गेलो


अजित पवार म्हणाले, इकडे आड, तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे. प्रत्येकाला संधी दिली जाते. मी कामाला सुरुवात केल्यावर मागे वळून बघितलं नाही. केंद्राचा निधी आणला. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचे जमत नाही, पण आम्ही मिळते-जुळते घेतलं, हे का केलं तुम्ही जाणून घ्या. पाण्यासाठी आम्ही सगळे मतभेद बाजूला ठेवलं. जनतेची कामे व्हावी यासाठी मी सरकारमध्ये गेलो. हर्षवर्धन पाटील आणि आम्ही खूप भांडलो. आता हर्षवर्धन पाटील म्हणाले, आपण साठीच्या पुढे गेलो, अजून किती दिवस असं राहणार, म्हणून आम्ही एकत्र आलो. 


निकाल लागला की, दुसऱ्या दिवशी अजित पवार कामाला


रात्री 2 ला झोपतोय आणि 5 ला उठतोय. आता हेलिकॉप्टरमध्ये डुलकी लागली. इथे उन्हात भात शिजेल आणि तव्यावर अंड्याची पोळी शिजेल, इतकं ऊन आहे. पण, मी तुम्हाला अंतर देणार नाही. मला जिरायत भाग हा शब्द काढून टाकायचं आहे. निकाल लागला की, दुसऱ्या दिवशी अजित पवार कामाला लागला असे समजा. आता पण एकच वादा आणि रात्री पण एकच वादा, असे करा, नाहीतर रात्री वेगळंच करू नका, असा इशारा देखील अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. 


सुनेत्रा विश्वासाला तडा जाऊ देणार


संस्था काढणे महत्त्वाचे पण संस्था चालवणे त्यापेक्षा महत्त्वाचे. वसंतदादा यांनी आठ संस्था काढल्या, त्या सगळ्या संस्थांची वाट लागलीय. आपले दात आणि आपलेच ओठ, उणी-धुणी काढायची नाही. जे तुम्हाला येऊन भेटत आहेत, त्यातील एकही तुमच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकत नाही. विरोध करून प्रश्न सुटत नाहीत, असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांवर टीका केली आहे. सुनेत्रा विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा विश्वासही त्यांनी जनतेला दिला आहे.