Onion Export : केंद्र सरकारने (Central Government) कांद्याबाबत (Onion) एक मोठा निर्णय घेतलाय. कांद्यावरील निर्यातबंदी (Onion Export Ban) आता उठवण्यात आली असून भारतातील कांदा आता जगभरात कुठेही 550 डॉलर प्रति मेट्रिक टन या किमान निर्यात शुल्क दराने विक्री केला जाणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रात राजकारण पुन्हा चांगलच पेटलं असून हा निर्णय म्हणजे ऐन निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारा असल्याची टीका शेतकरी संघटनांसह विरोधकांकडून केलीय तर दुसरीकडे आमचं सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं मत सत्ताधारी नेते व्यक्त करतायत. 


गेल्या काही वर्षांपासून कांदा हा शेतकऱ्यांना हसवतो कमी आणि रडवतोच जास्त आहे. कधी अस्मानी संकट तर कधी केंद्र सरकारची बदलती धोरणं यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. गेल्या वर्षभरातीलच परिस्थिती सांगायची झाली तर कांद्याला चांगला भाव मिळायला सुरुवात झालेली असतानाच अचानक डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात कांदा प्रश्न चांगलाच पेटला.  ठिकठिकाणी शेतकऱ्यांसह संघटना रस्त्यावर उतरल्या आणि सरकारच्या या निर्णयाचा त्यांनी जोरदार निषेध केला. 


केंद्राचा कांदा निर्यातबंदी हटवण्याचा निर्णय 


विशेष म्हणजे सध्या लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) सर्वत्र वातावरण बघायला मिळत असतानाच दिंडोरीसह अनेक लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना प्रचारादरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागत असल्याचं दिसून आलं. त्यातच शुक्रवारी रात्री केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने एक पत्रक जारी करत कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्याचा निर्णय घेतलाय. भारतातील कांदा आता जगभरात कुठेही 550 डॉलर प्रति मेट्रिक टन या किमान निर्यात शुल्क दराने विक्री केला जाणार आहे.


या निर्णयामुळे कांद्याला चांगला भाव मिळेल - भारती पवार 


यावर केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी म्हटले आहे की, आम्ही सगळ्यांनी मागणी केली होती की, काहीही करा आणि कांदा निर्यात खुली करा. या निर्णयामुळे कांद्याला चांगला भाव मिळेल. नोटिफिकेशनमध्ये स्पष्टता आहे की, किमान निर्यात मूल्य 550 प्रति मेट्रिक टन असेल. त्यामुळे आता कोणीही मनात संभ्रम बाळगू नये, निर्यात पूर्ण खुली झाली आहे. आवक वाढली की असे निर्णय घेतले जातात. आताही आवक वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.  आता MEP लावल्याने शेतकर्‍यांना दर मिळेल, शेतकर्‍यांकडून चांगल्या दराने माल घेतला जाईल. 


 शेतकरी संघटनांसह विरोधकांकडून टीका


कांद्याची निर्यात खुली करण्यात आल्याने राज्य सरकारवरचे एक मोठे संकट टळले असून यामुळे शेतकरी, व्यापारी तसेच निर्यातदारांना मोठा दिलासा मिळालाय तर दुसरीकडे याच निर्णयामुळे आता राजकारणाला देखील तोंड फुटले आहे. ऐन निवडणुकीच्या काळात कांद्यावरची निर्यात खुली करण्यात आली असून हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक असल्याची टीका शेतकरी संघटनांसह विरोधकांकडून केली जाते आहे.


देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना जशाच तसं उत्तर


विरोधकांसह शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या टीकेला थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जशाच तसं उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की, एकीकडे कांद्यावरून पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकारण पेटलंय. मात्र, दुसरीकडे या निर्णयानंतर आज पहिल्याच दिवशी अनेक बाजारसमितीमध्ये कांद्याच्या दरात क्विंटलमागे ४०० ते ८०० रुपयांची वाढ झाल्याचं दिसून आलं असून शेतकऱ्यांसाठी ही नक्कीच समाधानकारक बाब आहे. विरोधकांनी नेहमी राजकारण करण्याचा प्रयत्न केलाय मात्र आमच्या सरकारने नेहमीच शेतकरी आणि सर्वसामान्यांचे हित बघितले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, आगामी काळात शेतकऱ्यांवर अच्छे दिन येवोत आणि नेतेमंडळीच्या या राजकारणात जगाचा पोशिंदा मात्र भरडला जाऊ नये एवढीच अपेक्षा... 


आणखी वाचा 


Onion Export : अखेर कांदा निर्यात खुली, लासलगावात कालपेक्षा आजच्या दरात वाढ, जाणून घ्या कांद्याला किती मिळतोय भाव?


निर्यातबंदी हटवली, पण शेतकऱ्यांना फायदा होणार नाही, कारण... कांद्याच्या मुद्यावरुन शेतकरी संघटना आक्रमक