पिंपरी चिंचवड: चिंचवड विधानसभा लढण्याच्यादृष्टीने मी निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी नवा मार्ग निवडणार आहे, अशी घोषणा अजित पवार गटाचे नेते नाना काटे (Nana Kate) यांनी केली. अजितदादा यांच्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) साहेबांशी माझी नाळ अधिक जुळलेली आहे. तेव्हा तुतारी फुंकल्यावर आवाज येईलच, असं म्हणत शरद पवार गटात आचारसंहितेपुर्वी पक्षप्रवेश करणार असल्याचे ही संकेत नाना काटे यांनी दिले आहेत.


ज्यांना आमदार व्हायचं आहे, ते स्वतंत्र मार्ग निवडत आहेत, असे म्हणत पक्षांतर करणाऱ्यांसाठी अजित पवार यांनी मार्ग खुले केले आहेत. त्यानंतर काही मिनिटांतच नाना काटे यांनी आचारसंहितेपूर्वी मी माझा निर्णय घेणार, असे जाहीर केले. त्यामुळे अजित पवारांना चिंचवड विधानसभेत मोठा धक्का बसणार, हे उघड आहे. 


चिंचवड विधानसभेतून निवडणूक लढवायची, ही माझी सुरुवातीपासूनची भूमिका आहे. या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. आम्हाला निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे प्रत्येकजण कोणाच्या ना कोणाच्या भेटी घेत असतो.  अजितदादांनी म्हटलंय की, ज्यांना लढायचं आहे, त्यांना मार्ग मोकळे आहेत. आता लढायचं म्हटलं तर कोणतातरी पक्ष आणि चिन्ह पाहिजेच. त्यामुळे आता मी निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णय घेईन, असे नाना काटे यांनी म्हटले.


नाना काटे शरद पवार गटात का जाणार?


पिंपरी-चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या काही वर्षांपासून या पट्ट्यातील प्रमुख नेते अजित पवार यांच्याशी निष्ठावान राहिले आहेत. नाना काटे हेदेखील अजित पवार यांच्या कट्टर समर्थकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. अजित पवार हे सध्या महायुतीसोबत असले तरी जागावाटपात चिंचवडची जागा भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांना मिळणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. याउलट महाविकास आघाडीत चिंचवडची जागा शरद पवार गटाच्या वाट्याला येऊ शकते. त्यामुळेच नाना काटे यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. 


अजित पवारांच्या फोटोला डच्चू, संग्राम जगताप म्हणाले...


भाजपाच्यावतीने अहमदनगर शहर आणि परिसरात लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर सत्ताधारी महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान देण्यात आले होते. मात्र, राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेच छायाचित्र या फ्लेक्सवर नसल्याने विविध चर्चांना आता उधाण आले आहे. यावर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक पक्षाला स्वतंत्र असते मात्र खरं चित्र निवडणूक सुरु झाल्यानंतर सगळे एकत्र आपल्याला पाहायला मिळणार असं संग्राम जगताप यांनी म्हटले. निवडणूक काळ आला की चर्चा होत असतात त्यामुळे चर्चा होत राहतील, अशी प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी दिली. 


VIDEO: रवीकांत तुपकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत



आणखी वाचा


काँग्रेसचा बडा नेता वंचितच्या गळाला; आंबेडकरांकडून उमेदवारीची घोषणा, 10 मतदारसंघात मुस्लिमांना संधी