Ajit Pawar and Sharad Pawar : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या शेजारी बसणं पुन्हा एकदा टाळल्याचे दिसून आले. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा होत असताना दोन्ही पक्षांचे स्वतंत्र वर्धापनदिन पुण्यात आयोजित करण्यात आले आहेत. त्यातच अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसायचे टाळून नक्की कोणता संदेश देण्याचा प्रयत्न केलाय? याबात आता चर्चना उधाण आले आहे.
सोमवारी (दि. 09) वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये उस उत्पादक शेतकऱ्यांना ए आय अर्थात आर्टिफिशील एंटेलिजन्स तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण सगळ्यांच्या नजरा शरद पवार आणि अजित पवारांवर होता. कारण मंगळवारी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून वर्धापन दिनाचे स्वतंत्र कार्यक्रम पुण्यात आयोजित केलेले असताना व्हीएसआयच्या या कार्यक्रमाची चर्चा होणे सहाजिकच होते.
अजित पवारांनी शरद पवारांशेजारी बसणं टाळलं
या कार्यक्रमात अजित पवारांनी नेम प्लेटची अदलाबदल करत शरद पवारांच्या शेजारी बसण्याचे टाळले. व्हीएसआयच्या व्यवस्थापनाने स्टेजवर शरद पवारांच्या शेजारी अजित पवरांच्या बसण्याची व्यवस्था केली होती. मात्र, अजित पवारांनी स्वतःच्या हाताने नावाची नेम प्लेट उचलून त्याजागी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नावाची नेम प्लेट सरकवली. त्यामुळे बाबासाहेब पाटलांना काका-पुतण्यामध्ये बसण्याची वेळ आली. पण, अजित पवारांनी असं करण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती.
सहा महिन्यांनी 'त्या' घटनेची पुनरावृत्ती
23 जानेवारी 2025 ला याच व्हीएसआयच्या मंडपात अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणे टाळले होते. व्हीएसआयच्या व्यवस्थापनाने केलेली बैठक व्यवस्था अजित पवारांनी स्वतःच्या हातने बदलली होती. सहा महिन्यांनी त्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.
संभ्रम नको म्हणून सावध भूमिका?
शरद पवार व्हीएसआयचे अध्यक्ष आहेत तर अजित पवारांसह इतर नेते व्हीएसआयचे विश्वस्त आहेत. त्याचबरोबर अजित पवार, बाबासाहेब पाटील आणि माणिकराव कोकाटे हे राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. त्यांच्यामध्ये सर्वात वरिष्ठ मंत्री अर्थातच अजित पवार आहेत. त्यामुळे कार्यक्रमाच्या आयोजकांनी शरद पवांच्या शेजारी अजित पवारांच्या बसण्याची व्यवस्था करणे हे प्रोटोकॉलला धरुन आहे. पण, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतंत्र मेळावे मंगळवारी होणार असताना अजित पवारांनी कार्यकर्त्यांमध्ये उगीच संभ्रम नको म्हणून सावध भूमिका घेतली का? अशीही चर्चा आता रंगली आहे.
पवारांच्या राजकारणातील सस्पेन्स कायम
राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर सुरुवातीचे एक वर्ष अजित पवारांनी शरद पवारांसोबत कोणत्याही कार्यक्रमासाठी एकत्र येणे टाळले. मात्र राज्य सरकारमध्ये त्यांच्या पक्षाची कोंडी होतेय हे दिसल्यावर ते शरद पवारांच्या पुन्हा जवळ जात असल्याचे चित्र निर्माण झाले. कारण याच व्हीएसआयकडून एआय तंत्रज्ञानासंबंधी आयोजित तब्बल पाच बैठकांसाठी अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले. त्यातूनच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली. कार्यक्रमाला एकत्र तर यायचे पण शेजारी बसणे टाळायचे, यामुळे पवारांच्या राजकारणातील सस्पेन्स कायम राहिल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, एआयचा वापर शेतकऱ्यांना होईल. पण, पवार काका पुतण्याने एआयचा वापर मोठ्या खुबीने चालवलाय. कारण दोघे एकत्र येण्याने एआयच्या इथल्या बैठकांना राजकीय वळण लाभते, चर्चांना उधाण येते आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. किंबहुना असा संभ्रम कायम ठेवणे हेच पवारांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य राहिले आहे.
आणखी वाचा