बीड : विधानसभा मतदारसंघाचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांची कामे रोखल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर त्यांच्याविरुद्ध आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील बीड (Beed) मतदारसंघात सन 2019 पासून हीच परिस्थिती असून कोट्यवधी रुपयांची टक्केवारी घेऊन आमदार संदीप क्षीरसागर कामे अडवत असल्याचा थेट आरोप स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. केवळ तोडपाणी करण्यासाठी कामे अडविण्याचे काम आमदार करत आहेत. पालकमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचं आंदोलकांनी म्हटलं आहे. 

जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ग्रामीण भागातील जनतेची कामे अडविण्यात आली आहेत. केवळ आमदारच नाही तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील मतदार संघातील कामे रोखले असल्याचं म्हणत संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात आंदोलकांनी रोष व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे आंदोलनात सहभागी झालेले स्थानिक पदाधिकारी हे सत्ताधारी पक्षाचे असून महायुतीमधील तिन्ही पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे, विरोधी पक्षातील आमदाराविरुद्ध ही स्थानिक नेतेमंडळी एकत्र येऊन संताप व्यक्त करत आहे. 

जिल्हा परिषद, पीडब्लूडी विभागाची कामे अडवली आहेत. कार्यकारी अभियंता तोंडे, उप कार्यकारी अभियंता बोराडे आणि ज्युनिअर इंजिनिअर ठाकूर हे तिन्ही अधिकारी आमदार संदीप क्षीरसागर यांनी घरगडी म्हणून घरी ठेवले आहेत. या अधिकाऱ्यांना मंत्र्‍यांच फोन गेले, पालकमंत्र्यांचे फोन गेले तरीही अधिकारी काम ऐकत नाहीत, असा आरोपही आंदोलकांनी केला आहे. विशेष म्हणजे, या आंदोलनात महायुतीमधील तिन्ही पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरुद्ध संताप व्यक्त केला.

पुढील 3 ते 4 महिन्यात निवडणुका

दरम्यान, पुढील 3 ते 4 महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे, स्थानिक पातळीवर राजकीय वातावरण तापलं असून सत्ताधारी व विरोधी पक्षातील पदाधिकारी आक्रमकपणे भूमिका घेत आहेत. मतदारसंघात व वार्डांमध्ये सक्रीय झाल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकांपूर्वी गावातील विकासाची कामे मार्गी लावून मतदारांना सामोरे जाण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. 

हेही वाचा

रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा कशाला मागता, त्यापेक्षा त्यांनी जाऊन स्थिती बघावी; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले