पुणे: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडल्या. गुरूवारी (दिंनाक 12) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली. त्या भेटीच्या मोठ्या चर्चा राजकीय वर्तुळात झाल्या. मात्र, या भेटीचे फोटो कुठेही दिसून आले नाहीत. ना शरद पवारांच्या सोशल मिडियावर या भेटीचे फोटो दिसले ना अजित पवारांच्या सोशल मिडियावरती दिसले. इतर अन्य नेते देखील या भेटीवेळी उपस्थित होते. मात्र, त्यापैकी कोणीही या भेटीचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केले नाहीत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी दिल्लीमध्ये अनेक बड्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यावेळी त्यांच्यांसोबत त्यांची पत्नी खासदार सुनेत्रा पवार, आणि पक्षाचे इतर नेते देखील उपस्थित होते. गुरूवारी अजित पवारांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतली. त्यांच्या भेटीवेळीचे फोटो देखील सोशल मिडियावर शेअर करण्यात आले. पण, मग अजित पवारांनी आणि पक्षातील नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली त्याचे फोटो का शेअर केले नाहीत, याची चर्चा आता रंगली आहे.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी दिल्लीत काही नेत्यांची भेट घेतली. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्ली दौऱ्यावर होते. त्यांनी देखील अनेक पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेतल्या. त्यावेळी त्यांनी सर्व फोटो शेअर केले. अजित पवारांनी गेल्या काही दिवसांमध्ये दोनदा ते तीनदा दिल्लीवारी केली आहे. लागोपाठ दुसऱ्या आठवड्यात अजित पवारांनी दिल्लीचा दौरा केला. या भेटीत त्यांनी शरद पवार, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटी घेतल्या. त्या भेटींचे फोटो त्यांच्या सोशल मिडिया ‘एक्स’ वरून शेअर देखील केले. याबरोबरच त्यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली त्याचे फोटो शेअर केले नसल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
वाढदिवसानिमित्त घेतली भेट
शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवारांनी कुटूंबासह भेट घेतली. यावेळी अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण या भेटीचे फोटो अजित पवारांनी किंवा त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांनी ‘एक्स’ वरती शेअर करणं टाळल्याचं दिसून येत आहे. अजित पवारांनी ‘एक्स’वरून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण, त्यावेळी जुने फोटो शेअर केले आहे.
इतर नेत्यांचे फोटो दिले मात्र, शरद पवारांचा टाळला?
दिल्लीत अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह किंवा धनखड यांच्या भेटीचे फोटो शेअर करणाऱ्या अजित पवारांनी आपले काका शरद पवार यांचेच नेमके फोटो शेअर करण्याचं टाळलं का या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये दोन्ही नेते एकमेकांसमोर उभे होते. लोकसभेवेळी पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी पराभव केला अजित पवारांनी त्याचा वचपा बारामती विधानसभेमध्ये काढला. मात्र, आता पुन्हा एकदा या नेत्यांच्या भेटीने चर्चांना उधाण आलं आहे.