Solapur Lok Sabha Election 2024 : सोलापुरात एमआयएमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामाअस्त्र उघारले आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघात (AIMIM, Solapur Lok Sabha) एमआयएम उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याने पदाधिकारी नाराज झाले होते. ऐन लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने एमआयएममध्ये खळबळ उडाली आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता उमेदवार देण्याच्या हालचालीमुळे पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय. केवळ भाजपला मदत व्हावी यासाठी एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दि सोलापुरात उमेदवार देत असल्याचा पदाधिकाऱ्यांनी आरोप केला. एमआयएमचे जनरल सेक्रेटरी कोमारोव्ह सय्यद, महिला अध्यक्ष रेश्मा मुल्ला, वाहतुक संघटनेचे अध्यक्ष रियाज सय्यद, दक्षिण सोलापूर अध्यक्ष तौसिफ़ काझी या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. केवळ भाजपला मदत व्हावी यासाठी एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दि सोलापुरात उमेदवार देत असल्याचा पदाधिकाऱ्यांनी आरोप केला. 


भाजपला मदत मिळावी म्हणून उमेदवार - 


2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचा कुठल्याही प्रकारचा सांख्यिकी अभ्यास व मतदारसंघाची जात निहाय स्थितीचा अभ्यास न करता उमेदवारी जाहीर करीत आहेत. वास्तविक पाहता गेल्या लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडी व एमआय पक्षाची आघाडी होती. या आघाडीचे उमेदवार आदरणीय प्रकाश आंबेडकर होते. अशा नावाजलेल्या दिग्गज उमेदवारास 1 लाख 70  हजार मते पडून डिपॉझिट जप्त झाली होती आणि त्याचबरोबर मत विभागणीचा फायदा भारतीय जनता पक्षाला झालेला होता. त्यामुळे काँग्रेसच्या दिग्गज असलेल्या सुशीलकुमार शिंदे साहेबांचा पराभव झाला होता. वंचित एमआयएम यांची आघाडी असताना व दिग्गज उमेदवार असतानाही या मतदारसंघात यश आलेले नव्हते त्यामुळे आजच्या परिस्थितीत जातीय समीकरण पाहता एमआयएम पक्षाचा उमेदवार म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निवडणुकीत अप्रत्यक्षरीत्या मदत करण्यासारखे आहे, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.


सोलापुरात एमआयएमचा उमेदवार नको-


या मतदारसंघांमध्ये एमआयएमचे बूथ बूथनिहाय कार्यकर्ते नाहीत. कुठलीही निवडणूक यंत्रणेची तयारी नाही, याचा विचार होणे गरजेचे आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता एमआयएमचा उमेदवार या मतदारसंघात उभा करु नये अशी आमची भूमिका आहे. पणएमआयएमचे निरीक्षक व जबाबदार पदाधिकारी आपल्या वैयक्तिक स्वार्थापोटी सदर उमेदवारी जाहीर करण्याचे प्रयत्न करीत आहेत. याचा आम्ही जाहीर निषेध करीत असून पक्षाला वाहून घेतलेल्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी एमआयएम पक्षाचा राजीनामा सादर करीत आहोत. पुढील राजकीय भूमिका व वाटचाल कार्यकर्ते व मित्र वर्गासोबत चर्चा करून जाहीर करणार असल्याचे कोमारोव्ह सय्यद यांनी सांगितलं.