मुंबई : राजधानी मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांपैकी उत्तर-मध्य मुंबईतून (Mumbai Loksabha) यंदा भाजपाने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलं आहे. गत 10 वर्षांपासून या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीत्व केल्यानंतर भाजपाने यंदा येथील मतदारसंघातून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना उमेदवारी दिली आहे. तर, महाविकास आघाडीने यापूर्वीच येथून माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे, मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीमध्ये फाईट होत आहे. त्यातच, आता येथील मतदारसंघात नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. कारण, उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात एमआयकडून (AIMIM) देखील शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यात आला आहे. 


उत्तर-मध्य मुंबईतून महाविकास आघाडीने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे, वर्षा गायकवाड यांच्याविरुद्ध कोण, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. अखेर, भाजपाकडून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत उज्जल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, येथे गायकवाड व निकम अशी थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यातच, प्रिया दत्त यांनीही वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन कुठलीही नाराजी नसल्याचे स्पष्ट केले.तर,  एमआयएमने या मतदारसंघात कुठलाही उमेदवार दिला नव्हता, मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्यादिवशी रमजान चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे, सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत. 


महाविकास आघाडीची वाट बघून आम्ही आज अर्ज भरल्याचा दावा आमदारा वारीस पठाण यांच्याकडून करण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडून येथील मतदारसंघात मुस्लिम उमेदवार न दिल्याने  एमआयएम कडून उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रमजान चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आम्ही महाविकास आघाडीची शेवटपर्यंत वाट बघितली, महाविकास आघाडीने याठिकाणी मुस्लिम उमेदवार द्यायला हवा होता. नसीम खान यांना उमेदवारी न दिल्याने आम्ही एमआयएमकडून मुस्लिम उमेदवार  निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहोत. कुठल्याहीप्रकारे येथे वोट शेअर होणार नाहीत, एमआयएमचा मतदार इथे आहे. त्यामुळे, आमचे सगळे नेते प्रचारासाठी मुंबईत येतील, असेही आमदार वारिस पठाण यांनी म्हटलं आहे. 


मुस्लीम मतदार मोठ्या प्रमाणात


दरम्यान, उत्तर मध्य मुंबईतील वांद्रे पूर्व, कलिना व कुर्ला मतदारसंघात अल्पसंख्यांक व मुस्लीम समाजाचे मतदान लक्षात घेऊन एमआयएमने उमेदवारी जाहीर केली. मात्र, एमआयएमची ही उमेदवारी काँग्रेसला धक्का देणारी असून भाजपा उमेदवाराल मदत करण्यासाठीच असल्याची चर्चा आता मतदारसंघात सुरू झाली आहे. दरम्यान, एमआयएमचे आमदार वारीस पठाण हे भायखळा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत.