Nitin Gadkari: अहमदनगर जिल्ह्यात केंद्रीय महामार्ग मंत्रालयाच्या 30 हजार कोटीच्या कामामुळे जिल्हा देशाच्या नकाशावर येणार असून आगामी काळात नगर जिल्हा लॉजीस्टिक पार्कचा जिल्हा म्हणून नावारूपास येणार, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग-61 वर अहमदनगर येथे 331.17 कोटी रुपये किंमतीच्या व 3.8 किमी लांबीच्या 4-लेन एलेव्हेटेड स्ट्रक्चर उड्डाणपुलाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डिजिटल लोकार्पण संपन्न झाले. यावेळी बोलताना ते असं म्हणाले आहेत. यावेळी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील देखील उपस्थित होते.


अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून 13 कामे पूर्ण झाली आहेत.  24 कामे प्रगतीपथावर आहेत. 6 कामे लवकरच सुरू होणार आहेत. सध्या 17 हजार 228 कोटी ची कामे सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्यातून जाणाऱ्या तीन मोठ्या ग्रीन फिल्ड हायवे मुळे नगर शहर जिल्ह्याच्या नकाशावर येणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. अहमदनगर ते पुणे या रस्त्यावर होणारी रस्त्याची कोंडी दूर करण्यासाठी 56 किमी लांबीचा डबल डेकर रोड तयार करण्यात येणार आहे. तसेच नगर कल्याण या माळशेज घाटातील रस्त्यासाठी 168 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.


नव्याने लोकार्पण झालेल्या या उड्डाणपुलामुळे स्थानिक वाहतूक व राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक विभागली जाईल, ज्यामुळे अहमदनगर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल व अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळेल. रहदारीच्या रस्त्यावरून कमी वेळात प्रवास करणे शक्य होईल. प्रवास सुरक्षित होईल तसेच वेळेची व इंधनाची बचत होईल, ज्यामुळे अहमदनगर शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असंही ते म्हणाले आहेत. 






यावेळी बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले की, गडकरी यांना नेहमी एक तक्रार असते की एखादा प्रकल्प रखडलाय. मात्र हा राज्यातील पहिला प्रकल्प असेल जो वेळेआधी पूर्ण झाला आहे. अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे. त्यानिमित्ताने बोलताना आज उड्डाणपुलावर आतिषबाजी आणि लेझर शोचं आयोजन करण्यात आलंय, असं देखील विखे पाटील म्हणाले.