Congress New President: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवरून निर्माण झालेला गोंधळ अद्याप संपलेला नाही. यावरच आता पक्षाचे संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी जाहीर केले की 28 ऑगस्ट रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत नवीन अध्यक्षाच्या निवडीसाठी निवडणुकीच्या तारखांवर शिक्कामोर्तब केला जाईल. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी देशाबाहेर असल्याने ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या जवळपास काँग्रेसला पुढचा अध्यक्ष मिळू शकतो. राहुल गांधींनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्यास नाही असं म्हटल्यानंतर आता तब्बल 24 वर्षांनी काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


अशोक गेहलोत हे काँग्रेसचे पुढचे अध्यक्ष असू शकतात, अशी चर्चाही सध्या राजकीय वर्तुळात आहे. गेहलोत स्वतः राहुल गांधींना पदभार स्वीकारण्याचे आवाहन करत आहेत. राहुल गांधी पक्षाध्यक्ष न झाल्यास देशभरातील कार्यकर्त्यांची निराशा होईल. राहुल यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, असे गेहलोत म्हणाले.


मात्र राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार ते पुन्हा काँग्रेस अध्यक्ष होण्यास तयार नाहीत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देताना राहुल यांनी पक्षाची धुरा गांधी कुटुंबाबाहेरील नेत्याकडे सोपवण्यावर भर दिला. मात्र त्याच वर्षी ऑगस्टमध्ये काँग्रेस कार्यकारिणीने सोनिया गांधींना पक्षाच्या अंतरिम अध्यक्षपदासाठी राजी केलं. राहुल गांधी यांनी पद सोडले तरी पडद्याआडून त्यांनी पक्षाच्या निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, असं बोललं जातं.


अध्यक्षपदासाठी ही नावे आहेत चर्चेत 


अशोक गेहलोत, दिग्विजय सिंह, मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खरगे, अंबिका सोनी, मीरा कुमार यांच्या नावाची आगामी काँग्रेस अध्यक्ष म्हणून चर्चा केली जात आहे. गेहलोत यांचे नाव ठळकपणे घेतले जात आहे. काँग्रेसमधील असंतुष्ट नेत्यांचा गट म्हणजेच G23 आपला उमेदवार उभा करतील का, दे देखील पाहावं लागेल. तसेच पक्षातील एक वर्ग सोनिया गांधींना पदावर कायम ठेवण्याच्या बाजूने देखील आहे.


7 सप्टेंबरपासून सुरू होणार भारत जोडो यात्रा


याच दरम्यान 7 सप्टेंबरपासून राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो पदयात्रा सुरू करत आहेत. परदेशातून परतल्यानंतर राहुल हे 4 सप्टेंबर रोजी दिल्लीत महागाईविरोधात हल्लाबोल रॅलीला संबोधित करणार असून 5 तारखेला गुजरातमधील कामगार परिषदेत सहभागी होणार आहेत.