मुंबई : महापालिका निवडणुकीत (Election) राज्याच्या राजकारणात चांगल्याच नाट्यमय घडामोडी घडल्या असून इच्छुक उमेदवारांचे अश्रू अद्यापही थांबताना दिसत नाहीत. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक महापालिकेत मोठी बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळत आहे, विशेष म्हणजे सर्वच पक्षात ही बंडखोरी दिसून येत आहे. शिवसेना (Shivsena UBT) आमदार आदित्य ठाकरे यांचे विश्वासू, निकटवर्तीय आणि शिवसेना उबाठाचे आमदार सुनील प्रभू यांच्या मतदार संघातील युवासेना सहसचिव यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मालाडमध्ये (Mumbai) प्रभाग क्रमांक 43 हा शिवसेना ठाकरे गटाचा बाल किल्ला मानला जातो. मात्र, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युतीमध्ये प्रभाग क्र 43 राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला गेल्यामुळे समृद्ध शिर्के हे नाराज होते. त्यांच्या नाराजीचे सूर बंडखोरीत बदललयाने ठाकरे गटाला व ठाकरे-पवार यांच्या युतीला हा धक्का मानला जात आहे.
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधू एकत्र आले असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही ठाकरेंच्या युतीसोबत जाणे पसंत केले. त्यामुळे, मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंसह शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्रित लढत आहे. तर, भाजप शिवसेना शिंदे गटाची युती आहे. यासह, काँग्रेस आणि वंचितने आघाडी केल्याने इथे तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. मात्र, मुंबईतही मोठ्या प्रमाणात बंडखोरी पाहायला मिळत आहे.
शिवसेना-मनसे युतीनंतर मालाडमधील प्रभाग 43 मधून निवडणूक लढण्यासाठी ठाकरेंच्या पक्षाकडून तयारीचा आदेश समृद्ध शिर्के यांना देण्यात आला होता. मात्र, प्रभाग 43 हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीला गेल्यामुळे समृद्ध शिर्केंनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केला आहे. त्यामुळे या प्रभागामध्ये ठाकरेंच्या शिलेदाराविरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळेल. प्रभाग क्रमांक 43 मध्ये लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत या वार्डामधून ठाकरेंच्या शिवसेना उमेदवाराला चांगला लीड मिळाला होता. त्यामुळेच, ठाकरेंचा बाले किल्ला म्हणून हा प्रभाग ओळखला जातो. मात्र, जागावाटपात हा प्रभाग तुतारीला गेल्यामुळे इथले सर्व शिवसैनिक नाराज होते. म्हणून, अखेर बंडखोरी करत समृ्द्ध शिर्के यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत ठाकरेंना धक्का दिलाय. शिर्के यांच्या कामावर इथली जनता त्यांना निवडून देईल, असा विश्वास समृद्ध शिर्के यांनी व्यक्त केला आहे.
महायुतीचे दोन उमेदवार बाद
मुंबई महानगरपालिकेतील दोन वॉर्डमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाद झाले आहेत. त्यामुळे मतदानापूर्वीच या दोन्ही प्रभागांमधून महायुती रिंगणाबाहेर पडली आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 211 आणि वॉर्ड क्रमांक 212 मध्ये महायुतीचा एकही उमेदवार रिंगणात नसेल.
हेही वाचा
राष्ट्रवादीतून भाजपात आले, एका दिवसांत नगरसेवक झाले; महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयी चौकार