शिर्डी: शिर्डी येथे शनिवारपासून राष्ट्रवादी काँग्रेसचं (NCP) अधिवेशन पार पडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) या शिबिराला जणार नाहीत, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाने काल (शनिवारी) दिली होती. त्यांच्या अनुपस्थितीने वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची प्रकृती ठीक नसल्याने ते परळीत राहणार आहेत अशी माहिती देखील समोर आली होती. सध्या राजकीय वर्तुळात सुरू असलेले आरोप प्रत्यारोप, संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप असलेला वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची जवळीक यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील होत होती. त्यामुळे या शिबिराला मुंडेंनी पाठ दाखवल्याचं बोललं जात होतं. मात्र, आज ते शिबीरासाठी उपस्थित असणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मंत्री धनंजय मुंडे शिर्डी मध्ये दाखल झाले आहेत. पहाटे धनंजय मुंडे शिर्डीमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. आज शिबिराचा दुसऱ्या दिवशी मुंडे शिबिरात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे. पहाटे चार वाजता धनंजय मुंडे शिर्डीत दाखल झाले आहेत. धनंजय मुंडे आणि अजित पवार दोघेही एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. मुंडे यांची काल नवसंकल्प शिबिराला दांडी मारली, पण आज ते हजेरी लावणार असल्याची माहिती आहे. संकल्प शिबिराकडे थोड्याच वेळात बाहेर पडण्याची शक्यता आहे. शिबिराकडे रवाना होण्यापूर्वी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागितल्याचा आरोप धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड याच्यावर होत आहे. या खंडणीमुळेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे असल्याने कराडला पाठिशी घातलं जात असल्याचा आरोप झाला आहे. यामुळे या प्रकरणात कारवाई होत नसल्याचा आरोप सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राजकीय वर्तुळात सुरू आहे.
धनंजय मुंडे हे गेल्या चार दिवसांपासून परळीमध्येच आहेत. त्यांनी त्यांच्या जगमित्र कार्यालयात बसून जनता दरबार घेतला होता. याच कार्यालयात खून आणि मकोका गुन्ह्यातला आरोपी वाल्मिक कराड जनता दरबार घेत होता. तेथूनच मुंडेंनी लोकांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. त्यामुळे नेमकं धनंजय मुंडेंच्या मनात काय आहे याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव अजित पवारांवर असल्याची माहिती आहे.
पालकमंत्रीपदाची नावे जाहीर होताचं मुंडेंची पोस्ट
काल (शनिवारी) पालकमंत्री पदाची नावे जाहीर होताच मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली आहे. बीडचे पालकमंत्रीपद अजित पवारांकडे आल्याने त्यांचं स्वागत करत अभिनंदन मुंडेंनी केलं आहे. "बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय ना. अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे."
"बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आदरणीय अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो."
"सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार! मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील", अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.