Maharashtra Lok Sabha Exit Poll Result 2024 : लोकसभा निवडणुकीचं चित्र 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे. पण त्याआधी आज विविध एक्झिट पोलचे (Exit Poll ) आकडे समोर येत आहेत . यावेळी महाराष्ट्राच्या एक्झिट पोलकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कारण, यंदा महाराष्ट्राचं राजकीय गणित वेगळं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात उभी फूट पडली आहे. उद्धव ठाकरे हे भाजपपासून वेगळे झाले आहेत, तर अजित पवार यांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेत भाजपसोबत जवळीक साधली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये आहेत. तर उद्धव ठाकरे आणि  शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी काँग्रेस या पक्षासोबत जात महाविकास आघाडीची स्थापना केली. राज्यात पाच टप्प्यात झालेल्या प्रचारादरम्यान रंगतदार सामना पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे, शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राहुल गांधी, नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात जोरदार प्रचार केला. पण मतं कुणालाच्या पारड्यात पडणार, हे मतपेट्या उघडल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. पण त्याआधी येणाऱ्या एक्झिट पोलकडे राज्याचं लक्ष लागलेय. 


आज देशातील अखेरच्या टप्प्याचं मतदान पार पडलं. त्यानंतर विविध माध्यम संस्थांच्या एक्झिट पोल्सची आकडेवारी जाहीर होत आहे. यापैकी ABP-CVoter या देशातील सर्वात मोठ्या आणि विश्वासार्ह एक्झिट पोलनेही आपला अंदाज वर्तवलाय.  एबीपी-सी व्होटरच्या आजच्या एक्झिट पोलमध्ये टप्याटप्प्याने प्रत्येक राज्याचा निकाल जाहीर केला जाईल. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात कडवी टक्कर झाल्याचे दिसतेय. महाविकास आघाडीकडून एनडीएला जोरदार टक्कर दिल्याचे दिसतेय. 


महाराष्ट्रातील ABP C Voter सर्व्हेच्या अंदाजानुसार, महाविकास आघाडीला महराष्ट्रात 23 ते 25 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महायुतीला 22 ते 26 जागा मिळतील, असा अंदाज सर्व्हेत वर्तवण्यात आला.  


ABP C Voter Exit Poll result 2024 : महायुतीला फटका, महाविकास आघाडीला किती जागा?


एबीपी माझा सी व्होटर सर्व्हेमध्ये महायुतीला फटका बसत असल्याचे दिसतेय. यंदा राज्यात एनडीएला 22 ते 26 जागा मिळतील असा अंदाज सी व्होटर सर्व्हे व्यक्त कऱण्यात आलाय. 2019 च्या निवडणुकीत एनडीएने 41 जगांवर विजय मिळवला होता. त्यातुलनेत यंदा जवळपास 15 जागा कमी मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलय. दुसरीकडे महाविकास आघाडीला मोठा फायदा झाल्याचं दिसतेय. महाविकास आघाडीला राज्यात 23 ते 25 जागा मिळतील, असा अंदाज सी व्होटर सर्व्हे सर्व्हेतून व्यक्त करण्यात आलाय.  


2024 एबीपी न्यूज सी व्होटर एक्झिट पोल


महायुती
भाजप : 17
शिंदे गट : 6
अजित पवार गट : 1 


महाविकास आघाडी
ठाकरे गट : 9
काँग्रेस : 8
शरद पवार गट : 6
इतर : 1


एनडीए (NDA) : 353-383
इंडिया आघाडी (INDIA Alliance) : 152-182
इतर : 4 -12


2024 लोकसभा निवडणुकीत कुणी किती जागा लढल्या ?-


भाजप - 28 
शिवसेना (एकनाथ शिंदे) - 15 
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 4
रासप (महादेव जानकर )- 1
-------------------
शिवसेना (उद्धव ठाकरे) - 21
काँग्रेस - 17 
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 10 


महाराष्ट्रातील 2019 एक्झिट पोलमधील अंदाज किती खरा ठरला ?


2019 लोकसभा निवडणूक निकालाआधी आलेला एक्झिट पोलचा अंदाज पूर्णपणे चुकला होता. एक्झिटपोलच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात भाजप-शिवसेना आघाडीला 36 ते 38 जाग मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण निकालनंतर महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला 41 जागांवर यश मिळाले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला एक्झिट पोलमध्ये 10 ते 11 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण काँग्रेस-राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या.. अमरावतीमधून नवनीत राणा यांचा विजय झाला तर औरंगाबादमधून इम्तियाज जलील निवडून आले. काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागांवर विजय मिळवला. महत्वाचं 2019 मध्ये एक्झिट पोलमध्ये शिवसेनेला वर्तवलेल्या अंदाजापेक्षा निकालात जास्त जागा मिळाल्या होत्या. 


2019 च्या लोकसभेचा निकाल? 


2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला राज्यात 41 जगांवर यश मिळाले होते. भाजपने 23 तर शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 आणि काँग्रेसला 1 म्हणजेचे युपीएने 5 जागा जिंकल्या होत्या. तर एमआयएम-वंचितने 1 जागा, अपक्षने 1 जागा जिंकली होती.


Disclaimer : ABP C व्होटर एक्झिट पोल सर्वेक्षण 19 जून ते 1 जून 2024 दरम्यान घेण्यात आला. त्याची सँपल साईज ही 4 लाख 31 हजार 182 इतकी आहे आणि हे सर्वेक्षण सर्व 543 लोकसभेच्या जागांवर करण्यात आले. त्यामध्ये देशातील 4,129 विधानसभा जागांचा समावेश आहे. ABP C व्होटर सर्वेक्षणाचे त्रुटीचे मार्जिन राष्ट्रीय स्तरावर +3 आणि -3 टक्के तर प्रादेशिक स्तरावर +5 आणि -5 टक्के इतकं आहे.