Abhijeet Dipke on PM Modi: संसदेत 'सार्वजनिक परीक्षा (अनुचित मार्गांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक 2026' (Anti-Paper Leak Bill) मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर काल रात्री (30 जुलै) चौथा सेल्फी-स्टाईल व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये त्यांनी सांगितले की, हे विधेयक एक पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे आणि पेपर लीक करणाऱ्या माफियांची खैर केली जाणार नाही.
तुमची त्वचा देशाच्या भविष्यापेक्षा जास्त चमकदार
मोदी यांच्या सेल्फी-स्टाईल व्हिडिओवर 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पीएम मोदींच्या या व्हिडिओवर इन्स्टाग्रामवर खोचक कमेंट करत टोला लगावला. त्यांनी लिहिले की, तुमची त्वचा देशाच्या भविष्यापेक्षा जास्त चमकदार आहे. दरम्यान, यापूर्वी अभिजित दीपके यांनी केवळ कायदे करून पेपर लीक थांबणार नाहीत, तर अंमलबजावणी आणि सरकारची नीती स्पष्ट असणे गरजेचे आहे असे म्हटले होते. त्यांनी आधी असाही सल्ला दिला होता की, पंतप्रधान मोदींनी पद सोडून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनावे. याआधीही CJP ने आरोप केला होता की हे विधेयक पेपर लीक रोखण्यापेक्षा लीक झाल्यानंतर शिक्षा देण्यावर जास्त लक्ष केंद्रित करते.
कालच्या व्हिडिओत मोदी काय म्हणाले?
मोदी यांनी सांगितले की, आम्ही संसदेत एक विधेयक आणले होते, आणि मी तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे, संसदेच्या दोन्ही सभागृहांनी, बहुसंख्य आदरणीय खासदारांच्या उपस्थितीत, गेल्या दोन दिवसांपासून त्यावर सविस्तर चर्चा केली आहे, आणि आज दोन्ही सभागृहांनी कठोर कायदे आणि तरतुदींसह हे विधेयक मंजूर केले आहे. आता, एका विश्वासार्ह परीक्षा प्रणालीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. या दिशेने वाटचाल करण्यात यश आले आहे. हे कार्य पुढेही चालू राहील.
त्यांनी सांगितले की, मित्रांनो, एक विश्वासार्ह परीक्षा प्रणाली सुनिश्चित करण्यासाठी आम्ही एकामागून एक पावले उचलत आहोत. मग ते कार्यदलाची (टास्क फोर्सची) निर्मिती असो, जलदगती दृष्टिकोनाची (फास्ट-ट्रॅक अप्रोचची) निर्मिती असो, राज्यांकडून आलेल्या सूचनांचा विचार करणे असो. कारण गेल्या अनेक दशकांपासून प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकार अशा प्रकारच्या पेपरफुटीशी झुंज देत आहे. यामुळे मुलांचे भविष्यही धोक्यात येत आहे. हे सर्व लक्षात घेता, देशभरात, सर्व राज्यांमध्ये आणि केंद्र पातळीवरही शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करणे अत्यावश्यक झाले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणे आवश्यक झाले आहे. आणि त्याच वेळी, कोणताही पेपर माफिया, कोणतीही पेपरफुटी करणारी टोळी, देशाच्या मुलांच्या भविष्याशी खेळणारी कोणतीही टोळी असेल त्यांना पुन्हा सोडले जाणार नाही. अशा कठोर कायद्यांचीही गरज आहे. ही परिस्थिती जास्त काळ टिकू देणार नाही, या विश्वासाने मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वजण खांद्याला खांदा लावून एकत्र काम करूया, असे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
