ठाणे : वादग्रस्त वक्तव्यासाठी नेहमी चर्चेत असणारे बिग बॉस फेम कलावंत अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांनी सातारा मतदारसंघापाठोपाठ कल्याण मतदारसंघातही (Kalyan Lok Sabha Election) लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेतल्या ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यामध्ये कल्याण मतदारसंघात मुख्य लढत आहे. त्यांच्या राजकीय फोडणीला तेलाची धार द्यायला मी आलो असल्याचं सांगून बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. साताऱ्यात मतदान झाल्यावर पुढचे 13 दिवस आपण कल्याण मतदारसंघात ठाण मांडून बसणार असल्याचं बिचुकले यांनी सांगितलं.
अभिजीत बिचुकले यांनी या आधी साताऱ्यातून उमेदवारी अर्ज भरला आहे. साताऱ्यातून भाजपकडून उदयनराजे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे हे निवडणूक लढवत आहेत. साताऱ्यानंतर अभिजीत बिचुकले यांनी आता कल्याणमध्येही अर्ज भरल्याने त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
पुढचे 13 दिवस कल्याणमध्ये ठाण मांडणार
कल्याण लोकसभेसाठी 20 मे रोजी मतदान होणार असून त्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार लढत होण्याची चिन्हं आहे. असं असलं तरी कल्याणचा विकास आतापर्यतं कुणीही केला नाही, इथे फक्त राजकारण झालंय असा आरोप करत अभिजीत बिचुकले यांनी कल्याण लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली आहे. अर्ज भरल्यापासून पुढचे 13 दिवस आता आपण कल्याणमध्ये ठाण मांडून बसणार असल्याचंही ते म्हणाले.
अनेक निवडणुका लढवल्या, डिपॉझिट म्हणून हजारोंचे चिल्लर भरले
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आजवर अनेक निवडणुका लढवल्या आहेत. आपल्या वेगवेगळ्या स्टंट आणि वक्तव्याने ते कायम चर्चेत असतात. साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनाही त्यांनी निवडणुकीच्या माध्यमातून अनेकदा खुलं आव्हान दिलं आहे. अनेक निवडणुका लढवल्या असल्या तरी बिचुकलेंना अद्याप यश आलेलं नाही. '2019 चा मुख्यमंत्री मीच ठरवणार', असं बेधडक वक्तव्यही त्याने केलं होतं. गेल्या लोकसभा निवडणुकीत बिचुकले यांनी अपक्ष अर्ज दाखल करत अनामत रक्कम म्हणून 12 हजार 500 रुपयांची चिल्लर जमा केली होती.
महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री ही आपली पत्नी, अलंकृता बिचुकले असेल असं वक्तव्य केल्याने अभिजीत बिचुकले चर्चेत आले होते. आपल्यासोबत जो येईल त्याला आपण राज्याचा उपमुख्यमंत्री करणार अशीही ऑफर त्यांनी दिली होती.
शिवरायांच्या विचारांचा खरा वारसदार असल्याचा दावा
शिवाजी महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार आपणच असल्याचा दावा अभिजीत बिचुकले यांनी अनेकदा केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारस म्हणून माझ्या पाठीशी उभे राहा असं आवाहन बिचुकलेंनी केले आहे.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव संसद भवनला द्या अशी मागणी अभिजीत बिचुकले यांनी केली होती.
ही बातमी वाचा: