सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) भेटीनंतर शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील (Abhijeet Patil) यांनी आता भाजपचे उमेदवार रणजित निंबाळकरांची (Ranjit Nimbalkar) साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. अभिजीत पाटलांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर शिखर बँकेने जप्तीची कारवाई केल्यानंतर त्यांनी आता भाजपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे रणजित निंबाळकरांचं पारडं आता जड झालं असून मोहिते पाटलांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.


माढ्याच्या राजकारणात रोज नवा ट्विस्ट


माढ्याची लढत आता अत्यंत रंगतदार स्थितीत पोहोचली असून रोज काही ना काही ट्विस्ट येताना पाहायला मिळतात. त्यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याचं चित्र आहे. विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटलांनी शरद पवार गटाची साथ दिल्यानंतर मोहिते पाटलांची ताकद वाढली होती. पण शरद पवारांच्या सभेच्या दिवशीच राज्य सरकारने त्यांच्या कारखान्यावर जप्तीची कारवाई केल्याने त्यांनी आता भाजपच्या रणजित निंबाळकरांना साथ देण्याचा निर्णय घेतला. 


अभिजित पाटलांच्या कारखान्यावर कारवाई


राज्य सहकारी शिखर बँकेने अभिजित पाटील अध्यक्ष असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सर्व गोदामं सील करत  ताब्यात घेतली होती . त्यामध्ये जवळपास 1 लाखाहून जास्त साखरेच्या पोत्यांचा समावेश होता. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या अभिजीत पाटील आणखीनच अडचणीत आले होते. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे बँकांचे 450 कोटी रुपये थकलेले आहेत. त्याचत राज्य सरकारकडून ही कारवाई करण्यात आली. 


सध्या शेतकऱ्यांची ऊसाची बिले द्यायची असून त्यासाठी 100 कोटींपेक्षा जास्त रकमेची आवश्यकता आहे. पण कारखान्याकडे पैसेच नसल्याने या जप्तीची कारवाईमधून सुटकेसाठी अभिजित पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे. भाजपने त्यासाठी दबावतंत्राचा वापर केल्याचंही बोललं जातंय. 


देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर राजकारणाची दिशा फिरली


विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई झाल्यानंतर अभिजीत पाटलांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. आपला साखर कारखाना वाचवण्यासाठी काहीही करायला तयार आहे, कोणत्याही पक्षात जायला तयार असल्याचं वक्तव्य अभिजित पाटलांनी केलं होतं. फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांच्या राजकारणाची दिशा बदलली आणि आता त्यांनी भाजपच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला आहे.  


ही बातमी वाचा: