Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: सरकारी नोकरीच्या भरती परीक्षांमधील कथित गैरप्रकार, पेपर लीक आणि परीक्षेच्या पारदर्शकतेच्या प्रश्नांवरून झारखंडमधील सध्याचे विद्यार्थी आंदोलन (Jharkhand Student Protest) सुरू आहे. रांचीमध्ये JPSC आणि JSSC परीक्षांचे उमेदवार आंदोलन करत असून, आज 10 ऑगस्टला विद्यार्थ्यांनी विधानसभेकडे मोर्चा काढला. मोर्चादरम्यान काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांकडून पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर आणि लाठीचार्ज करण्यात आला. विद्यार्थ्यांकडून पाण्याच्या बाटल्या आणि चपला फेकण्यात आल्या. पोलिसांनी काटेरी तारांचे अडथळे आणि पाण्याचे फवारे मारून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, झारखंडमधील आंदोलनावर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके (CJP Abhijeet Dipke) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. झारखंडच्या विद्यार्थ्यांशी एकजूट...असं अभिजीत दीपके यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे. (Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest)
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन का करत आहेत? (Why are students protesting in Jharkhand?)
1. JPSC-JSSC परीक्षांमधील कथित अनियमितता-
विद्यार्थ्यांचा प्रमुख आरोप असा आहे की झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) आणि झारखंड कर्मचारी निवड आयोग (JSSC) यांच्या विविध भरती परीक्षांमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे. काही परीक्षांमध्ये पेपर लीक, निकालातील अनियमितता आणि प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे अनेक वर्षे सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये नाराजी वाढली आहे.
2. JSSC-CGL पेपर लीकचा मुद्दा-
JSSC-CGL परीक्षेतील पेपर लीक प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचा संताप आधीपासूनच आहे. 2024 मध्ये या प्रकरणावर तपास सुरू झाला होता. त्यानंतरही भरती परीक्षांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न कायम राहिल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.
3. JPSC 14व्या प्रिलिम्सच्या निकालावर आक्षेप-
JPSC 14व्या संयुक्त स्पर्धा परीक्षेच्या प्राथमिक निकालावरही उमेदवारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. निकालाची प्रक्रिया, श्रेणीनुसार कट-ऑफ जाहीर न होणे, निकालाच्या कागदपत्रांवरील स्वाक्षऱ्यांबाबतचे प्रश्न आणि सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या OMR शीटसह विविध मुद्द्यांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
4. स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची मागणी-
विद्यार्थ्यांची मागणी केवळ परीक्षा रद्द करण्यापुरती मर्यादित नाही. भरती प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांची उच्चस्तरीय किंवा स्वतंत्र संस्थेमार्फत चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी आणि भविष्यात परीक्षा पारदर्शक पद्धतीने घ्याव्यात, अशी मागणी आहे.
5. अनेक वर्षांची तयारी आणि रोजगाराचा प्रश्न-
झारखंडमध्ये सरकारी नोकरीच्या परीक्षांसाठी मोठ्या संख्येने तरुण वर्षानुवर्षे तयारी करतात. परीक्षा पुढे ढकलणे, प्रक्रिया वादात सापडणे किंवा पेपर लीकच्या आरोपांमुळे संपूर्ण भरती प्रक्रियेवर परिणाम झाला तर उमेदवारांचे वय, आर्थिक परिस्थिती आणि भविष्यातील संधी यावर परिणाम होतो. त्यामुळे हा आंदोलनाचा भावनिक आणि महत्त्वाचा मुद्दा आहे.
CBI चौकशीसह इतर मागण्यांवर विद्यार्थ्यांचा आक्षेप कायम- (Student March In Jharkhan Vidhansabha)
झारखंडची राजधानी रांचीमध्ये JPSC आणि JSSC परीक्षांमधील कथित अनियमितता, पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मागणीवरून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. 25 जुलैपासून सुरू असलेल्या या आंदोलनाने आता मोठं स्वरूप घेतलं असून, विद्यार्थ्यांनी आज, 10 ऑगस्ट रोजी झारखंड विधानसभेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. आंदोलक विद्यार्थ्यांची परीक्षांमधील कथित गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी, संबंधित परीक्षा रद्द करून पुन्हा घेणे आणि संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशी करण्याची प्रमुख मागणी आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि झारखंड सरकारमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या; मात्र मागण्यांवर पूर्ण तोडगा न निघाल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. सरकारने तीन परीक्षा रद्द करण्यास सहमती दर्शवली असली तरी CBI चौकशीसह इतर मागण्यांवर विद्यार्थ्यांचा आक्षेप कायम आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर JPSCच्या तीन सदस्यांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे.
झारखंडमध्ये सध्या काय सुरुय? (Jharkhand Student Protest)
आजच्या विधानसभेवरील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रांचीमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. विधानसभेच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पोलीस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी आंदोलन शांततेत पार पाडण्याचं आवाहन केलं असून, कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी बॅरिकेड्स आणि अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी यापूर्वी तिरंगा मार्चही काढला होता. त्यामुळे आजचा मोर्चा आणि त्यानंतर सरकारची भूमिका काय राहते, याकडे संपूर्ण झारखंडचं लक्ष लागलं आहे.
