Ganesh Naik on Eknath Shinde: वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे जोरदार निशाणा साधला आहे. "बिल्डरांच्या नादी लागून या लोकांनी महाराष्ट्र 10 वर्षे मागे नेला आहे. माझं कोणत्या व्यक्तीशी वाद नाही. मात्र, जनतेला गृहीत धरून जनता सहन करेल, असा समज ठेवून कोणी नाटक करेल तर त्याच्या नाटकाचा तमाशा कसा आहे हे दाखवायचं काम गणेश नाईक करेल," अशी अत्यंत खरमरीत टीका नाईक यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Continues below advertisement

Ganesh Naik on Eknath Shinde: नेमकं काय म्हणाले गणेश नाईक?

सानपाडा (Sanpada) येथील कार्यक्रमात बोलताना गणेश नाईक म्हणाले की, "कॉलनीमध्ये 20 वर्षांपूर्वी बांधलेल्या घरांची पुनर्बांधणी ही पुनर्विकासाऐवजी  क्लस्टर योजनेमधून होत असेल तर ते या शहरासाठी फार घातक आहे. स्वतःच्या फायद्यासाठी यांनी बिल्डरांच्या नादी लागून महाराष्ट्र दहा वर्षे मागे नेला आहे. कॉलनी भागातील इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर योजना लागू करणे हे बिल्डरांच्या घशात पैसे घालण्यासारखे आहे. मात्र कुणी जर असा प्रयत्न केला तर त्यांच्या घशातून पैसे काढण्यात येतील. जनतेला गृहीत धरून कुणी नाटक करणार असेल तर त्या नाटकातील तमाशा काय आहे, हे माझ्याकडून जनतेला दाखवण्यात येईल. आम्हाला बुद्धू समजून टपली मारणार असाल तर त्याचा हात धरून त्याची लायकी दाखवण्याची ताकद माझ्यात आहे," असा थेट इशारा त्यांनी दिला.

Aaditya Thackeray on Eknath Shinde: आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका 

गणेश नाईक यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय. आदित्य ठाकरे म्हणाले की, मंत्र्यांकडे डेटा खूप येत असतो, त्याच्यामुळे कदाचित खरं देखील असू शकतं. एकनाथ शिंदेंनी दहा वर्षात काय तर कितीतरी शेकडो वर्षे माणुसकीला मागे नेलेले आहे. केस लागली की दरेगावला का पळतात याचा आपण विचार करावा,"  असे त्यांनी म्हटले. 

Continues below advertisement

Yogesh Kadam on Ganesh Naik: योगेश कदमांचा पलटवार

दरम्यान, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गणेश नाईक यांच्यावर पलटवार केलाय. योगेश कदम म्हणाले की, गणेश नाईक यांनी आता थांबले पाहिजे. आपण महायुतीमध्ये सोबत आहोत, आपण एकत्र काम करत आहोत. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष काम केलेलं आहे. एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता तर आज गणेश नाईक साहेब मंत्री देखील नसते याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चांगले संबंध आहेत. महायुतीमध्ये कुठेही कटुता येऊ नये याची जबाबदारी त्यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली पाहिजे. त्यामुळे त्यांनी असे बोलणे थांबवावे. त्यांच्या मनातील जी काही खदखद असेल ते त्यांनी वरिष्ठांकडे मांडावी आणि ती कायमस्वरूपी संपवावी, अशी माझी विनंती आहे," असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा 

Manoj Jarange Patil and Chandrashekhar Bawankule: मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण