Aurangabad News: संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून भाजपनं माघार घेतली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे यावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत असून, सहकार मंत्री अतुल सावे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. एक आमदार वाढल्याने आम्हाला काहीही फरक पडत नाही, आमच्याकडे 166 आमदार असून, आणखी वाढू शकतात असेही सावे म्हणाले. औरंगाबाद येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आले असता सावे यांनी माध्यमांशी संवाद साधला. 


ऋतुजा लटके यांच्यविरोधातील उमेदवारी अर्ज भाजपने मागे घेतला आहे. यावर प्रतिक्रिया देतांना सहकार मंत्री अतुल सावे म्हणाले की, एखांद्या आमदाराचे निधन झाल्यास आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य पोटनिवडणुकीत उभं राहिल्यावर अशा परिस्थितीत अनेकदा उमेदवारी आम्ही मागे घेतली आहे. तर ऋतुजा लटके यांच्या विरोधातील उमेदवारी मागे घेण्याची सर्वांचीच मागणी होती. त्यामुळे सन्मानक विषय असल्याने त्यांना पाठींबा दिला पाहिजे होता आणि त्यामुळेच त्यांना आम्ही पाठींबा दिला असल्याचे अतुल सावे म्हणाले. तर आम्ही घाबरलो वैगरे नाही. कारण आम्ही घाबरलो असतो तर मैदानात उतरलोच नसतो असेही सावे म्हणाले. एक आमदार वाढल्याने आम्हाला काहीही फरक पडत नाही, आमच्याकडे 166 आमदार असून, आणखी वाढू शकतात असेही सावे म्हणाले. 


आता 2024  दाखवून देऊ: भुमरे 


हा घाबरण्याचा विषय नसून सहानभूतीचा आहे. ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडणून आणण्याचे सर्वांने आवाहन केल्याने, सर्वपक्षीय निर्णय घेण्यात आला. त्यातच आता राहिले तरी किती दिवस, 2024 ला पाहू ना आता काय होईल ते, त्यावेळी आम्ही काय घाबरणार आहोत का?, त्यावेळी सर्व जागा थोडी बिनविरोध सोडणार आहोत असा टोला भुमरे यांनी लगावला. तर ऋतुजा लटके यांच्याबाबत आम्ही कोणतेही अडचण आणली नव्हती, पण त्यांनी स्वतः अडचण करून घेतली होती, असेही भुमरे म्हणाले.