मुंबई: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शु्क्रवारी समारोप होत आहे. येत्या तीन महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार असल्याने हे शेवटचे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे होते. यानंतर सध्याची विधानसभा विसर्जित होऊन नवीन विधानसभा अस्तित्त्वात येणार आहे. सध्याच्या आमदारांपैकी कितीजण पुन्हा सभागृहात परतरणार , हे आगामी विधानसभा निवडणूक ठरवणार आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाचा (Maharashtra Adhiveshan 2024) शेवटचा दिवस हा महत्त्वाचा होता. यावेळी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केलेली एक कृती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
आदित्य ठाकरे यांनी आज विधानभवनाच्या इमारतीमधून बाहेर पडत असताना ते अचानक थांबले. त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते होते. आदित्य ठाकरे हे विधानभवनाच्या पायऱ्या उतरून थांबले आणि त्यांनी मागे वळून खाली बसत पायऱ्यांवर डोकं ठेवलं. आदित्य ठाकरे यांची ही कृती पाहून आजुबाजूला उभे असणारे अनेकजण अचंबित झाले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाल्यानंतर आदित्य ठाकरे तेथून मार्गस्थ झाले.
तत्पूर्वी आदित्य ठाकरे यांनी विधानभवनात विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान केले. गेल्या दोन दिवासांपासून आदित्य ठाकरे हे उबाठा गटाच्या आमदारांसोबत परळ येथील आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये थांबले होते. शुक्रवारी सकाळी ते ठाकरे गटाच्या आमदारांसोबत विधानपरिषदेच्या मतदानासाठी विधानभवनात आले. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. या 11 जागांसाठी एकूण 12 उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक चुरशीची झाली आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, शेकापचे जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर हे रिंगणात आहेत. मविआकडे तिसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पुरेशी मतं नाहीत. त्यामुळे ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर राजकीय चमत्कार करुन निवडून येणार का, याची अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
विधानपरिषद निवडणूक चुरशीची होणार?
मविआ आणि महायुती दोन्ही बाजुंकडून आपापल्या गटाचे सर्व उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. महायुतीकडून आपले 9 तर मविआकडून 3 उमेदवारांच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. 12 जणांपैकी कोणतातरी एक उमेदवार पडणार, हे निश्चित आहे. त्यामुळे मविआ आणि महायुतीच्या मतांची फाटाफूट होणार का, हे पाहावे लागेल. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे, त्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात होऊन आज रात्रीपर्यंत विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.
VIDEO: आदित्य ठाकरे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होतानाचा क्षण
आणखी वाचा