मुंबई: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. ते 35 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी राज्यभरातील शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते आणि नेत्यांची सतत रीघ लागली आहे. यावेळी मुस्लीम समाजाचे (Muslim Community) एक शिष्टमंडळही आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर आले होते. यावेळी मुस्लिम बांधवांनी आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देताना त्यांच्या अंगावर भगवी शाल घातली. याशिवाय, मुस्लीम बांधवांनी आदित्य यांना एक तलवारही भेट दिली. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विशेषत: मुंबईत मुस्लीम समाज ठाकरे गटाच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला होता. ईशान्य मुंबई, उत्तर मध्य आणि दक्षिण मध्य या लोकसभा मतदारसंघांमध्ये मुस्लीम समाजाने महाविकास आघाडीला लक्षणीय प्रमाणात मतं दिली होती. शिवसेना पक्षातील फुटीनंतर नव्याने जोडली गेलेली मुस्लीम समाजाची व्होटबँक ठाकरे गटासाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे. मुस्लीम समाजाकडून ठाकरे गटाला पडलेल्या मतांच्या टक्केवारीची भाजपसह महायुतीमधील अन्य पक्षांनीही गंभीर दखल घेतली होती. विधानसभा निवडणुकीतही मुस्लीम समाजाचा पाठिंबा कायम राहिल्यास ठाकरे गटाला फायदा होण्याची शक्यता आहे.
आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील विविध भागांमध्ये शिवसैनिकांकडून सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात विद्यार्थी गुणगौरव, रक्तदान शिबीर, महाआरोग्य शिबीर, मोफत अन्नदान यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत ते आदित्य ठाकरे हे शिवसैनिकांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
आदित्य ठाकरेंसाठी सुषमा अंधारेंची खास बर्थडे पोस्ट
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर खास पोस्ट लिहत आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चहूबाजुंनी शत्रूच्या गराड्यात आपले वडील एकटे सापडले आहेत. या संकटाची जाणीव होताच इतर कुणीतरी आपल्यासाठी मदतीचा हात घेऊन येईल याची वाट न बघता या चक्रव्युहात स्वतःला झोकून देत निकराची झुंज दिली. सेनेचा युवराज ही इमेज मागे पडत महाराष्ट्र धर्मासाठी लढणारा शिवसेनेचा युवासेनापती ही नवी ओळख महाराष्ट्राला होत होती, अशा शब्दांत सुषमा अंधारे यांना आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले.
त्यांची आक्रमक पण संयमी भाषण , लोकांना संवाद साधत असताना विश्वासार्हता , आश्वासकता आणि तितकीच विनम्रता ही त्यांच्याबद्दलची तरुणाई मध्ये क्रेज निर्माण होण्याची महत्त्वाची कारण. विरोधकांच्या टीके कडे अजिबात लक्ष न देता अर्जुनाला माशाचा फक्त डोळा दिसावा त्या पद्धतीने फक्त आणि फक्त महाराष्ट्र धर्म आणि मराठी माणसाचं हित हे लक्ष ठेवत ते तडफेने मांडत राहिले. वेदांत फॉक्सकॉन असेल किंवा मल्टी ड्रग प्रोजेक्ट असेल आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईचा संकोच करू पाहणाऱ्या प्रत्येकाशी दोन हात करायला ते सिद्ध झाले, असेही सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा
मुख्यमंत्रीपद आणि मंत्रिपदाची किंमत चुकवावी लागली का? आदित्य ठाकरे म्हणाले तरी काय??