नवी दिल्ली : देशातील 18 व्या लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीए आघाडीला बहुमत मिळालं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा शपथ घेत असून मोदींसमवेत घटक पक्षांसह एकत्र येत जवळपास 45 ते 46 मंत्री शपथ घेणार आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी 82 ते 83 खासदार शपथ घेऊ शकतात, असे म्हटले. पण, या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीला का स्थान नाही याची माहितीही अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. तसेच, आम्ही स्वत: काही वेळ थांबण्याचा प्रस्ताव दिला होता, त्यानुसार आम्ही थांबत आहोत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.  


एनडीए आघाडीचं हे सरकार असून अनेक घटक पक्ष असे आहेत, ज्यांना केवळ 1 संसद सदस्य आहे, त्यांना एक राज्यमंत्री स्वतंत्र पदभार अशी जबाबदारी देण्याचा निर्णय झाला आहे. तर काही काहीजणांचा एकही खासदार निवडून आला नाही. पण, सोशल इंजिनिअरींग म्हणून त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. त्यानुसार, आम्हालाही एक जागा राज्यमंत्रीपदाची ऑफर करण्यात आली होती, स्वतंत्र पदभार अशारितीने. आमच्याकडून प्रफुल पटेल यांचं नाव देण्यात आलं होतं. मात्र, प्रफुल पटेल यांनी यापूर्वी कॅबिनेटमंत्रीपदाची जबाबदारी निभावाली आहे. त्यामुळे, राज्यमंत्रीपद घेणं योग्य होणार नाही, आम्ही कॅबिनेटपदासाठी आग्रही होतो. त्यासाठी आम्ही थोडावेळ थांबण्याचा प्रस्तावही त्यांच्याकडे दिला. त्यानुसार, केवळ आमच्या एकट्यासाठी ठरलेला तो फॉर्म्युला बदलणं योग्य होणार नाही, म्हणून आम्हाला भाजपकडून थोडं थांबण्याचं सूचवण्यात आलं आहे.  


दरम्यान, आजच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीनंतर 82 ते 83 मंत्री हे कॅबिनेट व राज्यमंत्री होऊ शकतात, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली. शपथविधीनंतर डिनर कार्यक्रम आहे, त्यास आम्ही उपस्थित राहणार असून रात्री उशिरा महाराष्ट्रात जाणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली. 


राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य


अजित पवारांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण, सगेसोयरे यांसंदर्भात आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्र बसून लवकरच निर्णय घेऊ असे म्हटले. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी माझी असून आम्हाला अपयश आल्याचं मी मान्य करतो, असे म्हटले. तसेच, झालेल्या पराभवाची कारणंही अजित पवारांनी सांगितली.  तर, मंत्रिमंडळ विस्तार व्हायला पाहिजे, त्यानुसार लवकरच चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केल.


धीरज शर्मांवर जबाबदारी


धीरज शर्मा यांच्यावर देशातील युवक राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, त्यांना तसे पत्र देण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.