मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात काही परिवारांचे वर्चस्व आणि त्याच परिवाराच्या वाट्याला सगळी राजकीय पदं उपभोगायला मिळत असल्याचे चित्र आहे. या विधानसभेच्या निकालानंतर आणि नवे सरकार स्थापन झाल्यानंतर विधीमंडळात नातलगांचा मेळा पाहायला मिळणार आहेत. सक्रिय राजकारणात घराणेशाहीचा आणि नात्यागोत्यांचा हा पॅटर्न आज पवार, देशमुख, चव्हाण, मुंडे, विखे पाटील व्हाया आज ठाकरे परिवारापर्यंत येऊन पोहोचला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून तर पुत्र आदित्य ठाकरे आमदार म्हणून पहिल्यांदाच विधानसभेत दिसतील.


पवार फॅमिलीची 'पॉवर' राज्याच्या राजकारणात जबरदस्त आहे, ती देखील या राजकीय गोंधळात जास्त तीव्रतेने दिसून आली आहे. काका अजित पवार यांच्यासोबत आता पुतणे रोहित पवार देखील विधानसभेत दिसतील. तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा यांचे भाचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील हे देखील सभागृहात असणार आहेत.

एरव्ही थेट निवडणुकीचं राजकारण न करता पक्ष चालवणाऱ्या ठाकरे कुटुंबातील एका नाही तर दोन सदस्य थेट विधीमंडळात दिसणार आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असल्याने त्यांना येत्या सहा महिन्यात आमदार म्हणून निवडून यावं लागेल तर पुत्र आदित्य वरळी मतदारसंघातून निवडून आले आहेत.

लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्याचे आणि देशाचे राजकारण गाजवले. त्यांचे दोन्ही पुत्र आता राज्याच्या राजकारणात दिसतील. अमित देशमुख लातूर शहरातून तर धाकटे चिरंजीव धीरज देशमुख लातूर ग्रामीणमधून मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातलं मोठं नाव म्हणजे डी वाय पाटील. त्यांचे नातू ऋतुराज पाटील कॉंग्रेसच्या तिकीटावर कोल्हापूर दक्षिणमधुन निवडून आले तर काका सतेज पाटील परिषदेवर आमदार आहेत.

हे देखील वाचा - महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावरचा गोतावळा, घराणेशाहीचा रुबाब कायम

रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे या श्रीवर्धनमधून पहिल्यांदाच आमदार झाल्या आहेत. त्यांचे बंधू अनिकेत तटकरे कोकण पदवीधरचे आमदार म्हणून विधानपरिषदेत आहेत. बहुजन विकास आघाडीचे वसई आणि नालासोपाऱ्यातील आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर बापलेकाची जोडी निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचले आहेत.

माढ्यातले शिंदे बंधू देखील विधानसभेत दिसणार आहेत. माढा मतदारसंघातून बबनराव शिंदे राष्ट्रवादीकडून तर करमाळातून त्यांचे बंधू संजय शिंदे यांनी विजय मिळवला आहे. दापोलीमधून पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी संजय कदम यांचा पराभव करत विधानसभा गाठली आहे. रामदास कदम गेल्या सरकारमध्ये मंत्री होते. या सरकारमध्ये देखील त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. कुलाब्यातून विधान परिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांनी भाजपकडून विधानसभा गाठली आहे.