PM Narendra Modi National Youth Festival Inauguration Nashik नाशिक : आजचा दिवस भारताच्या युवा शक्तीचा दिन आहे. माझं भाग्य आहे की स्वामी विवेकानंदांच्या जयंतीला मी आज नाशिकमध्ये आहे. मी सर्वांना युवा दिनाच्या शुभेच्छा देतो. आज राजमाता जिजाऊ माँ साहेबांचीही जयंती आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करण्यासाठी मला महाराष्ट्राच्या वीरभूमीत येण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर होते. नाशिकमध्ये मोदींचा भव्य रोड शो झाला. यावेळी हजारो नाशिककरांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली. रोड शो नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या रामकुंड परिसराला त्यांनी भेट दिली. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. तसेच काळाराम मंदिराचे दर्शन घेतले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घानाप्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्र ही वीरभूमी
ते पुढे म्हणाले की, हा केवळ योगायोग नाही, देशातील अनेक महान विभूतींचा संबंध महाराष्ट्राच्या धर्तीशी संबंध आहे. महाराष्ट्र ही वीरभूमी आहे. राजामाता जिजाऊसारखी मातृशक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या नायकाला जन्म दिला. याच धर्तीने देवी अहिल्यादेवी होळकर, रमाबाई आंबेडकरसारख्या महान नारीशक्ती देशाला दिली. याच धर्तीने लोकमान्य टिळक, वीर सावरकर, दादासाहेब पोतनीस, चाफेकर बंधू, आनंद कन्हेरे असे वीर दिले.
काळाराम मंदिरात दर्शन सफाई करण्याचं सौभाग्य मिळालं
नाशिक पंचवटी भूमीत प्रभू श्रीरामाने अनेक काळ व्यतीत केला. मी आज या भूमीला श्रद्धापूर्वक प्रणाम करतो. मी आवाहन केलं होतं जानेवारीपर्यंत आपण सर्व २२ जानेवारीपर्यंत देशातील सर्व मंदिराची साफसफाई करावी. आज मला काळाराम मंदिरात दर्शन करण्याचा, मंदिर परिसरात सफाई करण्याचं सौभाग्य मिळालं. मी देशवासियांना आग्रह करेन, राम मंदिरात प्राणप्रतिष्ठाच्या पावन दिवशी देशातील सर्व मंदिरं, सर्व तीर्थक्षेत्रात स्वच्छता अभियान राबवा, श्रमदान करा, असे त्यांनी यावेळी म्हटले.
मोदींचा भव्य रोड शो
जवळपास ४० गाड्यांच्या ताफ्यासह मोदींचा भव्य रोड शो झाला. पंतप्रधान मोदींवर नाशिककरांनी फुलांचा वर्षाव केला. यावेळी नागरिकांनी जय श्रीराम, भारत माता की जय, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मिरची सिग्नलपासून मोदींच्या रोड शोला सुरुवात झाली. जनार्दन स्वामी मठ चौकापर्यंत हा रोड शो करण्यात आला.