मुंबई : शिवाजी पार्कवर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी सोहळा हा नियमांना धरूनच होता असा दावा मंगळवारी मुंबई महापालिकेच्यावतीने हायकोर्टात करण्यात आला. त्यावर खंडपीठाने याचिकाकर्त्यांना त्यांची भूमिका मांडण्याचे निर्देश दिले. तेव्हा याचिकाकर्त्यांनी वेळ मागून घेतल्यानं हायकोर्टानं 8 जानेवारीपर्यंत यावरील सुनावणी तहकूब केली.


नोव्हेंबर महिन्यातील नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचा 28 नोव्हेंबरला शिवाजी पार्कात शपथविधी सोहळा पार पडला. उच्च न्यायालायाने साल 2010 मध्ये शिवाजी पार्क हे 'शांतता क्षेत्र' म्हणून घोषीत करत 45 दिवस इथं लाऊडस्पीकरच्या वापरास परवानगी दिलेली आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर 6 डिसेंबर, 1 मे आणि 26 जानेवारीसह दसरा मेळावा आणि गुढीपाडव्याला मनसेची सभा यांसह काही ठराविक कार्यक्रमच आयोजित केले जाऊ शकतात. मात्र, त्यानंतरही पालिका आणि राज्य सरकारकडे सहा दिवस शिल्लक राहतात. त्याच उर्वरीत कोट्यातील दोन दिवसांत महाविकास आघाडीचा शपथविधी कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी पालिकेकडून देण्यात आली. त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्याही घेण्यात आल्याची माहिती पालिकेच्यावतीनं देण्यात आली.
Bhagat Singh Koshyari | महाविकासआघाडीच्या शपथविधी सोहळ्यावर राज्यपाल कोश्यारी नाराज : सूत्र | ABP Majha

शिवाजी पार्कात होणाऱ्या भव्य कार्यक्रमांमुळे तेथील शांतता भंग होते. तसेच शिवाजी पार्क हे 'शांतता क्षेत्र' असल्यामुळे याठकिाणी लाऊडस्पीकरचा वापर करता येत नसल्याचे सांगत 'वेकॉम ट्रस्ट'ने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने पालिका प्रशासनाला शिवाजी पार्क येथील खेळा व्यतिरिक्त पार पडणाऱ्या कार्यक्रमांची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याचे निर्देश दिले होते. मंगळवारी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी 27 नोव्हेंबर रोजी शिवतीर्थावर पार पडला.  या शपथविधी सोहळ्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली होती. शपथविधी सोहळाच्या प्रोटोकॉलनुसार व्यवस्था नव्हती, असा आक्षेप राज्यपालांनी नोंदवला होता. शपथविधीदरम्यान मंचावरील व्यवस्थेवर राज्यपालांनी नाराजी दर्शवली होती. शपथविधी सोहळ्याच्या प्रोटोकॉलनुसार व्यवस्था नव्हती. शपथविधीची व्यवस्था प्रशासनाला करु दिली नाही, ज्यामुळे मंचावर अव्यवस्था पाहायला मिळाली असे म्हणत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आक्षेपही नोंदवला होता.