जालना : आपल्याकडे अनेक महाविद्यालयांत प्राध्यापक तासिका घेत नसल्याची तक्रार नेहमी केली जाते. त्यामुळं अशाच तक्रारीला आळा घालण्यासाठी जालना जिल्ह्यातल्या बदनापूरमधील एका महाविद्यालयानं एक प्रयोग केला आहे. सध्या या प्रयोगाची पंचक्रोशीतील विद्यार्थी आणि पालकांमध्ये चर्चा आहे.

कुठल्या प्राध्यापकाला एक लाख 78 हजार तर कुणाला एक लाख 63 हजार रुपये पगार आहे. तर कुणाला एक लाख 39 हजार प्रत्येक प्राध्यापकांच्या पगाराचा हा पाच ते सहा अंकी पगार जालना जिल्ह्यातील बदनापूरच्या कला वाणिज्य महाविद्यालय व्यवस्थापनाने कॉलेजच्या भिंतीवर रेखाटला आहे. लाखोंचे हे आकडे लिहून संस्थाचालकांनी एक प्रकारे विद्यार्थ्यांना शासन त्यांच्या शिक्षणावर किती खर्च करतोय हे दाखवून दिलं आहे. शिवाय यामुळे तासिका घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या शिक्षकांना देखील धाक बसला आहे. अशा पद्धतीचे जाहीर फलक या पगार पत्रकाच्याखाली विद्यार्थ्यांनी सदरील शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असंही लिहिण्यात आलं आहे.

बहुतांश विद्यार्थ्यांचा शैक्षणिक ओढा हा ज्ञानार्जनाच्या नोकरीपेक्षा इतर शाखेकडे जास्त असतो. सहाजिकच हा पगार पाहून अनेक विद्यार्थ्यांच्या मनात प्राध्यापक होण्याची इच्छा जगृत होईल अशी आशा देखील कॉलेज व्यवस्थापनाला आहे. दरम्यान काही प्राध्यापक तासिकाच घेत नाहीत. याच्या काही तक्रारीही प्राचार्यांकडे होत्या. याच तक्रारीची सोडवणूक देखील या फलकमुळे आपोआप झाली आहे. ज्यामुळे विद्यार्थी तासिका घेण्यासाठी प्राध्यापकांच्या मागे तगादा लावतात. असं असलं तरी प्राध्यापकांनी या पगार फलकाचं स्वागत केलं आहे.

महाविद्यालयाच्या या फलकबाजीचा परिणाम तात्काळ दिसत असल्याचा दावा संस्थाचालकांनी केला आहे. यामुळे तासिकेला दांडी मारणाऱ्या प्राध्यापकांची हजेरी वाढलीय तर गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर देखील सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. शिवाय पगाराचे हे आकडे पाहून अनेकांनी भविष्यातील आपल्या शिक्षणाच नियोजन केलंय. यातील अनेकांनी आता अगोदरचे स्वप्न खोडून प्राध्यापक होण्याचा निश्चय केला आहे.

एखाद्या संस्थेच्या कर्मचाऱ्याचा पगार असा सार्वजनिक ठिकाणी जाहीर करता येवू शकतो का? याविषयी काही नियम आहेत का? असे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. पण यामुळे महाविद्यालयात तरी याचा सकारात्मक परिणाम पाहायला असल्याचा कॉलेज व्यवस्थापनाचा दावा आहे.