वसई : चोरी करुन चोर पळून गेल्यानंतर त्याला पकडण्यासाठी पोलिसांची खूप दमछाक होते. परंतु अनेकदा चोरी करताना चोर काही चुका करतो किंवा पुरावे मागे सोडून जातो. त्यामुळे तो चोर अलगद पोलिसांच्या तावडीत सापडतो. वसईत अशाच एका चोराला पोलिसांनी पकडले आहे.


हा चोर चोरी करुन पळून जाताना चोरीच्या ठिकाणी त्याचा मोबाईल विसरुन गेला. या मोबाईलच्या आधारावर अवघ्या काही तासातच पोलिसांनी या भुरट्या चोराला जेरबंद केले आहे.

वसईतल्या माणिकपूरमधील भवानी मोबाईल शॉपमध्ये हा चोर चोरी करण्याच्या उद्देशाने आला. दुकानात तो वेगवेगळ्या वस्तू पाहू लागला. हेडफोन्स दाखवा, ब्लूटूथ दाखवा, मोबाईल दाखवा असे बहाणे करून त्याने दुकानदाराला बोलण्यात आणि कामात गुंतवले. आपल्या जास्तीत जास्त वस्तू विकल्या जातील या आशेमुळे दुकानदारही त्याला वस्तू दाखवू लागला.

दुकानदार वस्तू दाखवण्यात, कपाटातून वस्तू काढण्यात व्यस्त असताना हा चोर दुकानाच्या गल्ल्यातून पैसे चोरुन पसार झाला. दुकान मालकाने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु चोर काही त्याच्या हाती लागला नाही. परंतु म्हणतात ना चोर चोरी केल्यावर एखादा पुरावा मागे ठेवून जातोच. तसा हा चोर त्याचा मोबाईल दुकानाच्या काउंटरवरच विसरुन गेला. त्यामुळेच तो पोलिसांच्या जाळयात अडकला.

चोर पळून गेल्यानंतर दुकान मालकाने पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली. चोराचा मोबाईल माणिकपूर पोलिसांच्या ताब्यात दिला. त्यानंतर पोलिसांनी त्या मोबाईलच्या आधारे काही तासातच चोराला अटक केली आणि त्याच्याकडून चोरीचे 18 हजार रुपये वसूल केले.

या चोराने दुकानाच्या गल्ल्यातून साधारण 28 ते 30 हजार रुपये चोरले होते. पण या पठ्ठ्याने चोरी केल्यानंतर काही तासात 10 हजार रुपये खर्च केले.