Nagpur News : योग गुरु रामदेव बाबा यांच्या पतंजलीच्या (Patanjali) आशियात खंडातील सर्वात मोठ्या फूड आणि हर्बल पार्कचे (Patanjali Mega Food And Herbal Park) उद्घाटन येत्या 9 मार्च रोजी नागपुरातील मिहान सेझ (SEZ) मध्ये पार पडणार आहे. पतंजली उद्योग समूहाकडून महाराष्ट्रात 10 हजार रोजगार निर्मिती करण्यात येणार असून या प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूर परिसरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी मदत होणार आहे. या प्रकल्पाची पायाभरणी ही सप्टेंबर 2016 मध्ये करण्यात आली असून आतापर्यंत यामध्ये 1 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. 

या फूड आणि हर्बल पार्क बद्दल अधिक माहिती देताना पतंजलीचे आचार्य बाळकृष्ण म्हणाले की, आम्ही या ठिकाणी जेवढा संत्रा शेतकऱ्यांकडून आणला जाईल तो सर्व घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्या फूड पार्कमध्ये रोज 800 टन संत्रा लागणारच आहे. शिवाय त्यापेक्षा जास्त संत्रा प्रतिदिन आला तरी त्याचा वापर करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. नागपुरातील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

स्थानिकांनाच रोजगार देण्याचा आमचा प्रयत्न- आचार्य बाळकृष्ण

पुढे बोलतांना आचार्य बाळकृष्ण म्हणाले की, आम्ही बी आणि सी ग्रेडच्या छोट्या आकाराची संत्रा ही घेणार आहोत. त्यामुळे लोकांना ए ग्रेडची  संत्री बाजारातून खायला मिळेल. संत्र्याचा फक्त ज्युससाठी वापर होणार नाही, तर संत्र्याच्या सालीचा, पल्पचा वापर ही इतर उत्पाद बनवण्यासाठी करणार आहोत. दरम्यान फूड आणि हर्बल पार्कमुळे दहा हजार लोकांना प्रत्यक्ष स्वरूपात रोजगार मिळेल, असे प्रयत्न राहणार आहे. स्थानिक महाराष्ट्रातील लोकांना रोजगार देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आम्ही या ठिकाणी स्थानिक तरुणांना फूड प्रोसेसिंग बद्दल कौशल्य देण्यासाठी ट्रेनिंग ही चालवण्याचा विचार असल्याचे ही आचार्य बाळकृष्ण म्हणाले. 

1 हजार कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक, शेतकऱ्यांनाही मोठा फायदा  

जे तंत्रज्ञान आम्ही इथे वापरणार आहोत, ते तंत्रज्ञान आशिया खंडात पहिल्यांदा फूड प्रोसेसिंग उद्योगात वापरले जात आहे. त्यामुळे आमचे उत्पादन जगात कुठल्या ही देशात निर्यात होऊ शकेल, असे दर्जाचे राहणार आहे. आतापर्यंत आम्ही 1 हजार कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. ती भविष्यात वाढत जाणार आहे. या प्रकल्पात आमच्याकडे सेझच्या बाहेर 225 एकर जमीन आहे, तर सेज (SEZ)मध्ये 100 एकर जमीन आहे. सध्या 500 पेक्षा जास्त कर्मचारी या ठिकाणी काम करत आहे. संत्र्याशिवाय या ठिकाणी आवळा, एलोवेरा, पेरू आणि इतर फळांचे ज्यूस तयार करण्याची तयारी आहे. फक्त शेतकऱ्यांनी आमच्यापर्यंत फळ घेऊन येण्याची गरज आहे.

या  ठिकाणी आम्ही दर वर्षी शेतकऱ्यांकडून जवळपास 15 हजार कोटींचे फळ, भाज्या व इतर शेती उत्पादन घेऊ शकणार आहोत. सध्या आमची स्थापित क्षमता रोज 800 टन संत्र्याचे ज्यूस काढण्याची आहे. मात्र, वर्षात आम्हाला संत्रा वर्षात 90 ते 100 दिवस उपलब्ध राहणार आहे. उरलेल्या दिवसात आम्ही इतर फळ आणि भाज्यांचे ज्यूस व इतर उत्पादन तयार करणार आहोत. आमचा अंदाज आहे की या  ठिकाणी आम्ही दर वर्षी शेतकऱ्यांकडून जवळपास 15 हजार कोटींचे फळ, भाज्या व इतर शेती उत्पादन घेऊ शकणार आहे, असेही आचार्य बाळकृष्ण म्हणाले.

हे ही वाचा