परभणी : महानगर मोठमोठ्या रस्त्यांनी जोडले गेले असतांना, राज्यातील ग्रामीण भागात अजुनही रस्त्यांची दुरवस्था पाहायला मिळत आहे. त्यातल्या त्यात परभणी (Parbhani) ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी गावकऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागतोय. परभणीच्या पालम तालुक्यातील तीन गावं मागच्या 4 वर्षांपासून रस्त्यासाठी संघर्ष करतायत. मात्र, त्यांना अद्याप रस्ता काही मिळाला नाही. त्यामुळे, गावकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी चक्क मुंडन आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केला. 


पालम तालुक्यातील तांबूळगाव, मुदखेड, सुपेगाव या 3 गावांना रस्ताच नाही. सध्या आहे त्या रस्त्यावर गुडघ्या एवढे खड्डे पडलेले आहेत. त्यात पावसाळा सुरू असल्याने गावकऱ्यांना चिखलातून प्रवास करावा लागतो. यामुळे शाळकरी मुले, गावकरी, महिलांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. जोरदार पाऊस झाल्यावर तर गावाबाहेर निघणं देखील कठीण होते. विशेष म्हणजे गावाला जोडणारा रस्ता तयार करण्यात यावा यासाठी गावकऱ्यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी सर्वांकडे चकरा मारल्या. मात्र, याचा काही उपयोग झाला नसल्याने गावातच आता गावकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. तर, या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने गावकऱ्यांनी मुंडन आंदोलन केले. तसेच प्रशासनाने आमच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास आणखी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. 


गावकऱ्यांचे प्रचंड हाल... 


सरकार आणि प्रशासनाकडून विकासाच्या गप्प्पा मारल्या जात असल्या तरीही अनेक गावात अजूनही साधा रस्ता नसल्याचे चित्र आहे. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील तांबूळगाव, मुदखेड, सुपेगावमध्ये देखील अशीच काही परिस्थिती आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात गावकऱ्यांना गावाबाहेर जाण्यासाठी रस्ताच नसतो. त्यामुळे रात्री-बेरात्री गावातील रुग्णांना रुग्णालयात नेतांना गावकऱ्यांचे प्रचंड हाल होतात. गावात जाणारा मुख्य रस्त्यावर प्रचंड चिखल असल्याने दुचाकी सोडा पायी चालणे देखील अवघड आहे. तर, प्रशासनाने याची दखल घेऊन रस्त्या बनवून देण्याची मागणी गावकरी करत आहे. 


शाळकरी मुलांचे हाल... 


गावातील अनेक मुलं शिक्षणासाठी गावाच्या बाहेर जातात. मात्र, पावसाळ्यात रस्ता चिखलमय होऊन जात असल्याने, त्यावरून पायी चालणे देखील अडचणीचे होते. त्यामुळे जोरदार पाऊस झाल्यास विध्यार्थ्यांना शाळेला सुट्टी मारावी लागते. याचे परिणाम त्यांच्या शिक्षणावर होत आहे. अनेकदा मागणी करून आणि निवेदन देऊनही प्रशासनाच्या वतीने दखल घेतली जात नसल्याने गावकऱ्यांमध्ये मोठा संताप आहे. तर, आता गावकऱ्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Parbhani Crime News : झुडुपाआड गेला अन् परतलाच नाही; अवघ्या दोनशे रुपयांसाठी तरुणाचा खून,परभणी जिल्ह्यातील घटना