Parbhani Crime News : परभणी (Parbhani) जिल्ह्यातील जिंतूर शहरातील बसस्थानक परिसरातील झुडूपामध्ये गुरूवारी एक मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु होता. मात्र, तिघांनी मिळून या वक्तीची हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. तर, अवघ्या 200 रुपयांसाठी ही हत्या (Murder) करण्यात आल्याचे देखील पोलिसांच्या तपासात समोर आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली असून, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र यशवंत सावंत असे मयत व्यक्तीचे नाव असून, राजेश पांडुरंग शिंदे (रा. संभाजीनगर जिंतूर), भारत आसाराम पहारे व शेख मुसेफ शेख मोहसीन (दोघेही रा. नामदेव नगर, जिंतूर) असे आरोपींचे नावं आहेत. 


अधिक माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एका 27 वर्षीय युवकाचा मृतदेह जिंतूर शहरातील बसस्थानक परिसरातील झुडूपामध्ये आढळून आला होता. दरम्यान, पोलिसांनी मयत व्यक्तीची ओळख पटवली असता, सातारा जिल्ह्यातील वाघजई वाडी येथील रहिवासी महेंद्र यशवंत सावंत यांचा मृतदेह असल्याचे समोर आले. तसेच ते मजुरी कामानिमित्त जिंतूर शहरात आले होते. दरम्यान, मोलमजुरी करून ते स्वतःचा उदरनिर्वाह करीत होते. 


मात्र, त्यांना दारूचे व्यसनही होते. त्यामुळे, बुधवारी शहरातील एका देशी दारूच्या दुकानावर दारू पिऊन ते लघुशंकेसाठी बसस्थानक परिसरातील झुडुपाआड गेले. मात्र, तिथून परत आलेच नाही. शेवटी त्यांचा दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळून आला. या मृतदेहाच्या तोंडावर दगडाने ठेचलेले व गळा रुमालाने आवळलेला दिसून आला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा परभणी व जिंतूर शहर पोलिसांचे पथक कामाला लागले 


अवघ्या 200 रुपयांसाठी घेतला जीव...


महेंद्र सावंत यांच्या मृतदेहाच्या तोंडावर दगडाने ठेचलेले व गळा रुमालाने आवळलेला दिसून आल्याने हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे पोलिसांनी यासाठी परिसरात असलेल्या आणि बसस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज आधारे आरोपींचा शोध सुरु केला. त्यात महेंद्र सावंत यांच्या पाठीमागे बुधवारी आरोपी राजेश पांडुरंग शिंदे, भारत आसाराम पहारे व शेख मुसेफ शेख मोहसीन हे तिघे जातांना दिसून आले. परंतु, परत येताना ते तिघेच आढळून आल्याने पोलिसांचा या तिघांवर संशय बळावला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. दरम्यान, पोलिसांनी अधिकची चौकशी केली असता त्यांनी तिघांनी मिळूनच महेंद्र सावंत यांची हत्या केल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे, अवघ्या 200 रुपयांसाठी ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Parbhani : पतीला भीती दाखवण्यासाठी गेली अन् खरोखरच गळफास बसल्याने जीव गमावून बसली; पाहा नेमकं काय घडलं?