परभणी : मी चार वेळा आमदार म्हणून निवडून आलो, पण मला अद्यापही मंत्रिपद मिळालं नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहिल्याच निवडणुकीत विजयी झालेल्या संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांना मात्र मंत्री केले असं वक्तव्य अजित पवार गटाचे आमदार विक्रम काळे (Vikram Kale) यांनी केलं. परभणीतील एका आढावा बैठकीत मंत्री संजय बनसोडे यांच्यासमोरच त्यांनी हे वक्तव्य केलं.


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे 13 जानेवारीला परभणीत युवा संकल्प मेळावा घेणार आहेत. त्याच्या पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलं होते. या बैठकीला राज्याचे मंत्री आणि परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे आणि राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे उपस्थित होते. त्यावेळी बोलताना विक्रम काळे म्हणाले की, संजय बनसोडे उदगिरचे आमदार आहेत, ते मला ज्युनियर आहेत. मी चार वेळा निवडून आलो आहे, पण मला मंत्रिपद मिळालं नाही. फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार आपण पुढे घेऊन जात आहोत असं अजितदादांनी आपल्याला सांगितलं आहे, त्यामुळे संजय बनसोडे यांना मंत्रिपद देण्यात आलं. त्यांना परभणीचे पालकमंत्रिपदही दिलं. मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान होतं. त्यामुळे त्या ठिकाणी पालकमंत्री देण्यात आलं.


मंत्रिपदाच्या वक्तव्यानंतर लगेच आमदार काळे यांनी सारवासारव केली आणी अजित पवारांनी संजय बनसोडे यांना मंत्री का केलं याचं स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, अजित पवार हे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारे आहेत. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी ही सर्व धर्म समभाव जपते. त्यामुळेच सर्वच धर्मीयांना मंत्रिमंडळामध्ये प्रतिनिधित्व मिळवून देण्यात आले आहे. त्यामुळेच संजय बनसोडे यांची मंत्रिपदी वर्णी लागली असल्याचे ते म्हणाले.


विक्रम काळे चार वेळा आमदार


राष्ट्रवादीचे विक्रम काळे हे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार झाले आहेत. कधीकाळी मराठवाडा शिक्षक संघाच्या ताब्यात असणाऱ्या या मतदारसंघात 2004 मध्ये राष्ट्रवादीचे वसंत काळे आपल्या ताब्यात घेत, राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. तेव्हापासून हा मतदारसंघ कायम राष्ट्रवादीकडेच राहिला आहे. तर 6 जानेवारी 2010 ते 5  डिसेंबर 2016 पर्यंत विक्रम काळे या मतदारसंघात विजयी होऊन महाराष्ट्र विधान परिषदेत पहिल्यांदा गेले. त्यानंतर 8 फेब्रुवारी 2017 मध्ये पुन्हा दुसऱ्या वेळेस निवडुन आले. त्यानंतर 2017 ते 2022 पर्यंत ते तिसऱ्यांदा औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर गेल्या वर्षी झालेल्या निवडूकीत त्यांनी पुन्हा बाजी मारली. 


ही बातमी वाचा :