परभणी : मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळत नसल्यामुळे एका तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. जिंतुर तालुक्यातील बोर्डी येथील 39 वर्षीय बापुराव उत्तमराव मुळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान परभणी जिल्ह्यातील ही दुसरी आत्महत्येची घटना आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मागील अनेक दिवसांपासून विविध मार्गांनी आंदोलन केले जातायत. त्यातच मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाची हाक दिली. त्यांच्या उपोषणाला पाठींबा देत परभणीमध्येही साखळी उपोषण सुरु करण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मागील अनेक दिवसांपासून विविध मार्गांनी आंदोलन केले जातय. मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. तर जरांगे यांच्याकडून तरुणांना आत्महत्या न करण्याचं आवाहन करण्यात येतय.
नेमकं काय घडलं?
बापुराव मुळे हे अंतरवाली सराटी येथील सभेला उपस्थित होते. तेव्हापासून बापुराव हे आरक्षण मिळावे असे म्हणत होते. त्यांना तीन मुले असून ती शिक्षणात हुशार आहेत.आरक्षण मिळत नसल्याने बापुराव मुळे यांनी रविवारी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी बोरी पोलिसात नोंद घेण्यात आली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पांडूरंग गोफणे, तहसीलदार सरोदे, सह पोलीस निरीक्षक. सरला गाडेकर, पोलीस उप निरीक्षक अनिल खिल्लारे यांनी भेट दिली. दरम्यान तात्काळ मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे तसेच आत्महत्या केलेल्या तरुणांच्या कुटुंबालाही भरीव मदत करण्याची मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
लातूरमध्येही तरुणाची आत्महत्या
मराठा आरक्षणाचा विषय सध्या ऐरणीवर आला आहे. राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन, मोर्चा, ठिय्या आंदोलन, उपोषण अश्या अनेक मार्गाने सरकारपर्यंत आरक्षणाच्या मागणीचा पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, काही तरुण भावनिक होऊन टोकाचे पाऊल उचलत आहे. लातूर जिल्ह्यातील गोंद्री (ता.औसा) येथील मराठा तरुण शरद वसंत भोसले यांनी आज सकाळी आत्महत्या केली आहे. सरकार मराठ्यांना आरक्षण का देत नाही? अशा आशयाची चिठ्ठी लिहून या तरुणाने स्वतःच्या शेतातल्या आपट्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. हा तरुण अवघ्या 32 वर्षाचा असून, घरात पत्नी, दोन मुली, आई-वडीलांसह भाऊ असा परिवार आहे.
मराठवाड्यातील आठवी आत्महत्या...
मागील काही दिवसांत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठवाड्यात होणाऱ्या आत्महत्या वाढल्या आहेत. मागील चार दिवसांत मराठवाड्यात आठ आत्महत्या झाल्या आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण आक्रमक होत असतानाच भावनिक होऊन आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल देखील उचलत आहे. विशेष म्हणजे तरुणांनी आत्महत्या करू नयेत असे आवाहन सतत मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात येत आहे.