परभणी : राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्यानंतर आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना अनेक ठिकाणी उमेदवारांकडून स्तर घसरत चालल्याचे पाहायला मिळत आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघात भाजप महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी यांच्यात चांलगच वॉर रंगलं आहे. जिंतुर विधानसभेत (Jintur) भांबळे-बोर्डीकरांमध्ये हे ऑडिओ वार पाहायला मिळत असून भाजप नेते रामप्रसाद बोर्डीकर यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अपशब्द काढल्याचा कथित ऑडीओ व्हायरल झाला आहे. मात्र, तो ऑडिओ मॉर्फ करण्यासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांच्या पदाधिकाऱ्यांने पैसे दिल्याचा आरोप करणाराही कथित ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर मतदारसंघातील राजकीय वातावरण चिघळल्याचं पाहायला मिळत आहे.
परभणीच्या जिंतुर विधानसभा मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विजय भांबळे यांना तिकीट दिलं आहे. तर, भाजपकडून रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर निवडणुकीच्या मैदानात आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या लढाईत प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आता जोरदार ऑडिओ वाद रंगलाय. भाजप नेते रामप्रसाद बोर्डीकर यांचा एका कार्यकर्त्यांशी फोनवर बोलतानाचा ऑडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, ते मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी अपशब्द काढत असल्याचे ऐकायला मिळते. ही ऑडिओ क्लीप विजय भांबळे यांचे पदाधिकारी सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. मात्र, या व्हायरल ऑडिओ क्लीपनतंर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार विजय भांबळे यांच्यावर आरोप करत एक ऑडिओ क्लीप व्हायरल केली आहे. भांबळे यांच्या पदाधिकाऱ्यानेच हा ऑडिओ मार्फ करण्यासाठी त्या कार्यकर्त्याला दीड लाख रुपये दिल्याचा दुसरा ऑडीओ व्हायरल केला जातोय. या दोघामध्ये कथित ऑडिओ वार सुरू असताना मराठा समाजाने अनेक ठिकाणी रामप्रसाद बोर्डीकर यांच्या या ऑडिओबाबत निषेध नोंदवला आहे. त्यामुळे, मतदारसंघातील राजकीय वातावरण तणावाचे बनले असून लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
2019 ला मेघना बोर्डीकर यांनी विजय मिळवला
दरम्यान, भाजपचे नेते रामप्रसाद बोर्डीकर आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे यांच्यातून विस्तवही जात नाही. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून रामप्रसाद बोर्डीकर यांच्या ऐवजी त्यांच्या कन्या मेघना साकोरे बोर्डीकर या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. 2019 सालच्या निवडणुकीत मेघना बोर्डीकर आणि विजय भांबळे यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत विजय भांबळे यांचा मेघना बोर्डीकर यांनी अवघ्या 3717 मतांनी पराभव करत पहिल्यांदाच विजय मिळवला होता.
हेही वाचा
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''