परभणी : सोमनाथ सूर्यवंशीची हत्या ही पोलिसांनीच केली आहे असा थेट आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठीशी घालण्यासाठी खोटं वक्तव्य केलं असल्याचा आरोपही त्यांनी केला. संविधानाचं रक्षण करणाऱ्या सोमनाथची हत्या करणाऱ्यावर कारवाई व्हावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवशी या तरुणाच्या मृत्यूनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या प्रकरणात नेमकं काय झालं, आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली याची माहिती यावेळी राहुल गांधी यांनी घेतली. या वेळी राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे राज्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.
निळा टी शर्ट परिधान करून राहुल गांधी यांनी परभणीतील दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली. न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरूणाचा मारहाणीच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर या प्रकरणाती दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
सोमनाथची हत्या पोलिसांनीच केली
राहुल गांधी म्हणाले की, "पोस्टमार्टेम रिपोर्टमधून स्पष्ट झालंय की शंभर टक्के ही हत्या आहे. पोलिसांनीच न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथची हत्या केली. सोमनाथ दलित असल्यानेच त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास व्हावा. या प्रकरणात राजकारण नको तर न्याय हवा."
परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना झाल्यानंतर बंद पुकारण्यात आला होता. या बंददरम्यान काही समाजकंटकांनी हिंसक आंदोलन केले ज्यामुळे पोलिसांनी धरपकड केली. या कारवाईत 35 वर्षीय तरुण वकील सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक झाली होती. न्यायालयीन कोठडीत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
सोमनाथच्या कुटुंबीयांचे आरोप
जोपर्यंत त्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत आमचे समाधान होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी मीडिया समोर पुरावे द्यावेत अशी मागणी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सोमनाथला वेगवेगळ्या आजार होते. त्याला कुठलाही आजार नव्हता. माझा मुलगा कुठेही सहभागी नव्हता. त्याला निर्घृणपणे पोलिसांनी मारले. जोपर्यंत त्या सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमच्या समाधान होणार नाही. तसेच मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पुरावे द्यावेत की आमचा सोमनाथ कुठे होता? त्यांनी कोणाला दगड मारले? कुणाचं काही जाळपोळ केली का? विनाकारण आमच्या मुलाला मारले. त्यामुळे जोपर्यंत ही चौकशी तात्काळ होत नाही दोष अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचे समाधान होणार नसल्याची प्रतिक्रिया सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.