Parbhani: परभणीत न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचे पडसाद राज्यभर उमटले. विधिमंडळात यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचा पाहायला मिळाल्यानंतर आज परभणीत राहुल गांधींसह शिवसेना आणि भाजपचे मंत्रीही सोमनाथच्या कुटुंबीयांचा सांत्वन करण्यास येणार आहेत. परभणी शहरातील संवेदनशील घटनांमुळे तापलेल्या वातावरणात आज काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी परभणीत दाखल होणार आहेत. त्यामुळे राजकीय घटनांना वेग आला आहे. आता राहुल गांधींचा उपस्थितीवर अक्षय घेत भाजप आमदार आशिष देशमुख यांनी जोरदार टीका केली आहे. परभणीतील घडामोडी, न्यायालयीन चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. मग राहुल गांधी परभणीला येऊन जातीय विद्वेष पसरवण्यासाठी येत आहेत का असा सवाल त्यांनी केला. काँग्रेस गेल्या 70 75 वर्षात संविधानाची मोडतोड केली म्हणून राहुल गांधी यांनी आज परभणीत देशाची माफी मागावी असेही आशिष देशमुख म्हणाले.
सोमनाथ यांच्या अंत्यविधीनंतर घरी जात असताना आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचाही मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे परभणीतील वातावरण चांगलेच तापले होते. विधिमंडळातही त्याचे तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या कुटुंबांना भेट देऊन सांत्वन केल्यानंतर आज काँग्रेस नेते राहुल गांधी परभणीत दाखल होतील.
परभणीत येऊन जातीय विद्वेष वाढवण्याचा प्रयत्न ?
परभणीतील घडामोडीनंतर न्यायालयीन चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत. मग राहुल गांधी परभणीला येऊन जातीय विद्वेष पसरवण्यासाठी येतात का असा सवाल भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केला. ते म्हणाले, परभणीत मनो रुग्णाने जी कृती केली त्याचा आम्ही सर्व निषेध करतो. राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाने आत्तापर्यंत 80 वेळा संविधान बदललं. त्यामुळे परभणीत येऊन राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी. त्यांच्या आजीने स्व. इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावून लोकशाहीला धाब्यावर बसवलं. काँग्रेस गेल्या 70 -75 वर्षात संविधानाची तोडमोड केली म्हणून राहुल गांधींनी आज परभणी देशाची माफी मागावी असेही देशमुख म्हणाले.
सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाचं करणार सांत्वन
काँग्रेस नेते राहुल गांधी आज दुपारी दोन वाजता परभणीत दाखल होतील. प्रथम ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना भेटून परिस्थिती समजून घेणार आहेत. त्यानंतर विजय वाकोडे यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट ते घेतील. तत्पूर्वी शिवसेना गटाचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनीही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे दुःखात सहभागी होणार असल्याचे सांगितले.