परभणी : महामार्गावरील अपघाताचे (Accident) प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. वर्तमानपत्रात अपघाताच्या बातम्यांची संख्या पाहाता वाहतूक सुरक्षेवर आणखी भर देण्याची गरज व्यक्त होत आहेत. आता, परभणी (Parbhani) जिल्ह्यातील जिंतूर औंढा महामार्गावरील पुंगळा गावाजवळ भीषण अपघाताची घटना घडली असून यात दोघांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावरुन वेगाने जात असलेल्या ट्रकने थेट झाडाला धडक दिली. वेगात धावणारी ट्रक झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ट्रकचालक आणि क्लीनर दोघांचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान, अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
जिंतूर औंढा महामार्गावरील पुंगळा गावाजवळून जाणाऱ्या एपी 16 टीजे 6318 क्रमांकाचा भरधाव ट्रकने झाडाला धडक दिली. ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वेगवान ट्रक थेट झाडाला धडकली. ही धडक इतक्या जोराची होती की, ट्रकच्या समोरचा भाग अक्षरशः चेमटून गेला असून ट्रकचा क्लिनर जागीच ठार झाला आहे. तर, चालक केबिनमध्ये अडकून पडला होता. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र चालकाचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
अपघातानंतर क्रेनच्या सहाय्याने झाडात अडकलेल्या जखमी ट्रक ड्रायव्हरला बाहेर काढण्यासाठी तब्बल चार तास शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा
जळगावातील पाचोऱ्यात ढगफुटी, दगड नदीला पूर; निम्म गाव जलमय, उपकेंद्रही पाण्याखाली, पाहा फोटो