Parbhani Somnath Suryawanshi Case : परभणीमध्ये घडलेल्या हिंसाचारानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा (Somnath Suryawanshi Case) संशयास्पद मृत्यू झाला होता. आता या प्रकरणात अखेर विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी SIT ची अधिकृत घोषणा केली असून, यामध्ये परभणी जिल्ह्यातील एकाही पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा समावेश करण्यात आलेला नाही.
हायकोर्टाच्या आदेशानंतर हालचालींना गती
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मागील आठवड्यात राज्य सरकारला निर्देश दिले होते की, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणात आठ दिवसांच्या आत एसआयटी स्थापन करण्यात यावी. या आदेशाच्या अनुषंगाने पोलीस महासंचालकांनी कारवाई करत स्वतंत्र तपास पथकाची स्थापना केली आहे.
सीबीआय अधिकारी हिरेमठ SIT च्या अध्यक्षपदी
या SIT चे नेतृत्व सुधीर हिरेमठ यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. हिरेमठ हे सध्या पुणे सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत आणि नुकतेच सीबीआयमधून महाराष्ट्रात बदली होऊन आलेले अधिकारी आहेत. त्यांच्याकडे या प्रकरणाचा तपास जबाबदारीने सोपवण्यात आला आहे.
इतर सदस्य कोण?
SIT मध्ये सदस्य म्हणून नागपूर सीआयडीचे पोलीस अधीक्षक अभिजीत धाराशिवकर यांची तसेच नांदेड सीआयडीचे पोलीस उप अधीक्षक अनिल गवाणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, या तपास पथकात परभणी जिल्ह्यातील कोणताही पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी सहभागी नसणार, असे स्पष्ट निर्देश राज्य पातळीवरून देण्यात आले आहेत.
सर्व तपास वरिष्ठ पातळीवरून होणार
या विशेष तपास पथकाच्या कार्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथील अपर पोलिस महासंचालक यांच्या थेट मार्गदर्शनाखाली राहणार आहे. त्यामुळे तपास अधिक उच्च पातळीवर आणि पारदर्शकतेने होणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण नेमकं काय?
परभणी शहरात गेल्यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढे संविधानाची विटंबना झाल्याची गंभीर घटना घडली होती. या प्रकारानंतर संपूर्ण शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. निषेध करताना आंदोलकांनी काही वाहनांची तोडफोडही केली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अटक सत्र सुरु केले होते. अटक झालेल्यांमध्ये 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी यांचा देखील समावेश होता. मात्र, अटकेनंतर काही दिवसांतच न्यायालयीन कोठडीत त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. प्रारंभी, सोमनाथ यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, नंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर समाजाच्या विविध स्तरांत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. या घटनेचे पडसाद राष्ट्रीय स्तरावर उमटले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परभणीत येऊन पीडित सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली होती. तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पीडितांच्या न्यायासाठी कोर्टात बाजू मांडत त्यांच्यामागे ठामपणे उभे राहिल्याचे पाहायला मिळाले. आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी अखेर एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
आणखी वाचा