परभणी : वाहतूक पोलिसांकडून (Police) दुचाकीस्वार असेल किंवा वाहनधारक, यांच्यावर विविध कारणास्तव कारवाईचा बडगा उगारला जातो. अनेकदा दंड भरुन वाहनं सोडून दिली जातात, तर काहीवेळा वाहनांवर कारवाई करत पोलीस ठाण्यात नेलं जातं. मात्र, अनेकदा वाहतूक पोलीस आणि वाहनधारकांमध्ये वाद झाल्याचं सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओतून दिसून येते. आता, परभणी (Parbhani) जिल्ह्यातही आरटीओ (RTO) अधिकाऱ्याकडून दंडाच्या नावाखाली मनमानी आणि अतिरेक होत असल्याचा आरोप एका युवकाने केला आहे. कारण, या वाहनधारकास तब्बल 22 हजार रुपयांचा दंड आरटीओ अधिकाऱ्याकडून देण्यात आला आहे. सोशल मीडियावरही हा व्हिडिओ व्हायरल झाला असून अनेकांनी RTO अधिकाऱ्यांवरच निशाणा साधला आहे.
आरटीओ अधिकाऱ्याने एका दुचाकी चालकास तब्बल 22,250 रुपयांचा दंड ठोठवला आहे. विशेष म्हणजे हा दंड विविध 13 प्रकारच्या वाहतूक उल्लंघनाचा असल्याचेही आरटीओने म्हटलं आहे. मात्र, आपणास लावण्यात आलेला दंड चुकीच्या पद्धतीने लावलेला असून दंड परत घ्यावा, अशी मागणी अॅड. विक्रमसिंह दहे या दुचाकीस्वाराने केली आहे. गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे आणि नियमांचे उल्लंघन केल्याने दंड आरटीओ अर्जुन खिंडरे यांनी ही कारवाई केली असून आरटीओ अधिकाऱ्याच्या या कारवाईची परभणी जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
परभणीतील वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर दहा हजार पर्यंत दंड आकारल्याचे अनेक उदाहरणं आपण पाहिले मात्र परभणीच्या मानवत मध्ये एका दुचाकी स्वाराला तेही पेशाने वकील असलेल्या दुचाकी स्वाराला आरटीओच्या मोटार वाहन सहायक निरीक्षकांनी १३ प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी थेट 22250 रुपयांचा ऑनलाईन दंड ठोठावला आहे.हा दंड चुकीच्या पद्धतीने ठोठावण्यात आला असल्याचा आरोप मानवत येथील वकील विक्रमसिंह दहे यांनी केलाय त्यामुळे हा दंड परत घेण्याची मागणी त्यांनी केली आहे तर दुसरीकडे दहे यांनी वाहतुकीच्या अनेक नियमांचे उल्लंघन केले त्यामुळे हा दंड त्यांना लावण्यात आला असुन तो योग्य आहे त्यांच्याकडे कुठलेही डॉक्युमेंट नाहीत आणि याचमुळे तेरा प्रकारचे दंड लावण्यात आले असल्याचे आरटीओ मधील मोटार वाहन निरीक्षक अर्जुन खिंडरे यांनी एबीपी माझाशी फोनवरून बोलताना सांगितले आहे. त्यांच्याकडे जर डॉक्युमेंट असतील तर सात दिवसात त्यांनी आरटीओ कार्यालयात सादर केले तर हा दंड कमी होऊ शकतो अशीही प्रतिक्रिया खिंडरे यांनी दिली आहे.