Parbhani : शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन अधिग्रहणाला राज्यभरामधून विरोध होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सक्तीने जमीन अधिग्रहण करण्याचा आदेश दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशाची होळी करत परभणीत शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणाविरोधात बोंबाबोंब आंदोलन केलं. आम्ही सरकारने कितीही सक्ती केली तरीही एक इंचही जमीन देणार नसल्याचा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला आहे.
जमीन मोजणीसाठी येणारे अधिकारी तरी राहतील नाहीतर शेतकरी राहतील
अधिकारी मोजणीसाठी जर शेतात आले तर एक तर अधिकारी राहतील नाही तर शेतकरी राहतील असा इशाराही यावेळी दिला. परभणीच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येत जोरदार बोंबाबोंब करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
शक्तिपीठ महामार्गास कॅबिनेटची मंजुरी
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक काल मंत्रालयात (Mantralaya) संपन्न झाली होती. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शक्तिपीठ महामार्गास मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील 18 तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या या महामार्गास अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांचा विरोध असतानाही मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आल्याने शेतकरी (Farmers), आंदोलक आक्रमक होतील, असे दिसून येते. तसेच, राज्यात वस्तू व सेवा कर विधेयक आणण्याचा निर्णयही या बैठकी घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग - पवनार (जि.वर्धा) ते पत्रादेवी ( जि. सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र गोवा सरहद्द शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गास मान्यता. राज्यातील साडेतीन शक्तिपीठ , दोन ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर अंबेजोगाई सहित १८ तीर्थक्षेत्रांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग. प्रकल्प महामंडळामार्फत राबवणार, प्रकल्पाच्या आखणीस तसेच भूसंपादनासाठी २० हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग) मात्र, ठिकठिकाणी शेतकरी याचा विरोध करत आहेत. परभणीच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येत जोरदार बोंबाबोंब करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
कसा असेल शक्तिपीठ महामार्ग
विदर्भातील वर्धा ते कोकणातील बांधापर्यंत एकूण 805 किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग असणार आहे. राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग सहा पदरी असेल. महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असेल. 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असतील. शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल 86 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता; विधानसभेच्या निवडणुकीआधी थांबवलं होतं भूसंपादन