Parbhani News: परभणी जिल्ह्यातील (Parbhani District) सेलू तालुक्यातील वालूरमध्ये एक विचित्र घटना समोर आली असून, उच्च रक्तदाब या आजाराचे नियमितपणे औषध घेणाऱ्या महिलेने नजरचुकीने उंदीर मारण्याच्या औषध घेतल्याने तिचा मृत्यू झाला आहे. महिलेनं चुकून उंदीर मारण्याचं औषध घेतल्याचं लक्षात येताच महिलेला तत्काळ परभणी येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असतानाच महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. प्रियंका संतोष टेकाळे (वय 28 वर्षे रा. वालूर) असे मृत महिलेचे नाव आहे. तर याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, प्रियंका टेकाळे यांना उच्च रक्तदाब या आजाराचा त्रास असल्याने त्या नियमितपणे औषध घेत होत्या. दरम्यान, 4 एप्रिलच्या सायंकाळी या महिलेने नियमितपणे घेत असलेल्या बीपीच्या औषधी गोळ्या समजून नजरचुकीने उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या घेतल्या. दरम्यान, काही वेळाने प्रियंका यांना उलटी होऊन त्रास सुरू झाला. त्रास अधिकच वाढल्याने त्यांना तात्काळ वालूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता विषबाधा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांना परभणी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.


संभाजीनगला नेत असताना वाटेतच प्राणज्योत मालवली


सुरवातीला महिलेला परभणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र  महिलेची प्रकृती चिंताजनक होत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी 5 एप्रिल रोजी परभणीहून छत्रपती संभाजीनगर येथे नेण्याचं ठरलं. मात्र संभाजीनगला नेत असताना वाटेतच या प्रियांका यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान याप्रकरणी अनिल शामराव टेकाळे यांनी खबर दिल्यावरून परभणीच्या सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहेकाँ अशोक हिंगे हे करीत आहेत.


केवळ नजरचूक जिवावर बेतली...


अनेकदा घरात कामानिमित्त वेगवेगळे विषारी औषध आणलेले असतात. तसेच शेतात फवारणीसाठी लागणारे औषध देखील असतात. मात्र अशी औषधं घरात ठेवताना काळजी घेतली पाहिजे. बेडरूम, किचन तसेच रोज वावरणाऱ्या ठिकाणी अशी औषधी ठेवू नयेत. तसेच लहान मुलं जातील आशा ठिकाणी देखील ही औषधी ठेवू नयेत. अन्यथा आशा घटना घडत असतात. तर केवळ नजरचूक जिवावर बेतल्याच वालूर येथील घटनेतून समोर आले आहे. त्यामुळे घरात उंदीर मारण्याचे किंवा इतर विषारी औषध ठेवताना काळजी घेतली पाहिजे.


महत्वाच्या इतर बातम्या : 


Farmer Success Story : पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत भाजीपाला शेतीतून लाखोंचं उत्पन्न, परभणीतील प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा